कुपवाड : कुपवाड शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था, अपूर्ण ड्रेनेज कामे आणि पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करून राज्य शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली महापालिकेचे नगरसेवक विष्णू माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.
कुपवाड ड्रेनेज योजनेवर आतापर्यंत सुमारे २५० कोटी रुपये खर्च झाले असले, तरी रस्त्यांचे पुनर्बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या कामांमुळे शहरातील अनेक भागांत रस्ते उखडले गेले असून, पावसामुळे चिखल, खड्डे आणि राडारोड्याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ड्रेनेज योजनेसाठी सुमारे १५ हजार चेंबर्स उभारण्याचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत केवळ ४ हजार चेंबर्स पूर्ण झाले असून उर्वरित कामे रखडली आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीअभावी प्रकल्पाची गती मंदावल्याचे चित्र आहे.
अष्टविनायक नगर, गंगानगर, विनायकनगर, आनंदनगर, श्यामनगर, विजयनगर, विद्यानगर, तुळजाईनगर, जिजामाता कॉलनी, स्वामी समर्थ नगर, वसंत कॉलनी, सैनिक नगर, अकुज नगर, तीर्थकर कॉलनी, मंगलमूर्ती कॉलनी यांसह अनेक भागांतील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
महापालिकेकडे उपलब्ध निधी अपुरा असल्याने शहरातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य शासनाने विशेष निधी उपलब्ध करून देत १५० कोटी रुपयांचा रस्ते विकास आराखडा मंजूर करावा, अशी मागणी विष्णू माने यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. यामुळे कुपवाड शहरातील रस्त्यांचे जाळे सक्षम होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या