प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : क्राईस्ट असेंबली ट्रस्टच्या वतीने ७ जुलै २०२६ रोजी ट्रस्टचा द्वितीय वर्धापन दिन विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजसेवेचा वसा जपत ट्रस्टने यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब (ब्लडप्रेशर), नेत्र तपासणी, सीबीसी (CBC) तसेच रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. या सर्व तपासण्या डॉ.अशोक वंगपाटी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत ट्रस्टच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.गेल्या दोन वर्षांपासून क्राईस्ट असेंबली ट्रस्ट सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहे. दिवाळीनिमित्त अनाथाश्रमातील मुलांना कपड्यांचे वाटप, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट व स्वेटर वितरण, नाताळ सणानिमित्त उघड्यावर राहणाऱ्या गरजू व्यक्तींना ब्लँकेट,अन्न व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, तसेच वृक्षारोपणासारखे पर्यावरणपूरक उपक्रम ट्रस्टकडून नियमितपणे राबविले जातात.
यावेळी बेळगाव येथील पास्टर रामय्या पोतीपोगु यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले.वाढते तापमान आणि पर्यावरणाचा ढासळता समतोल लक्षात घेता प्रत्येकाने वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.निसर्गाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून अध्यात्मासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही समाजापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या प्रबोधनातून स्पष्ट केले.क्राईस्ट असेंबली ट्रस्टचे गेल्या दोन वर्षांतील समाजहिताचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, सेवाभावी वृत्तीमुळे ट्रस्टला समाजातील विविध स्तरांतून मोठा प्रतिसाद व प्रशंसा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष आकाश गुंटगाणी, सचिव मनीष कंदुला, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्र भाऊ चंडाळे, पास्टर गुंटगाणी, ज्योती पापाराव म्हेत्तर, मोजेस म्हेत्तर, अनोष म्हेत्तर, विष्णू म्हेत्तर, ऐज्रा कंदुला, सिंन्नु म्हेत्तर, विकी म्हेत्तर तसेच मंडळीतील पास्टर, सामाजिक बांधव आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्राईस्ट असेंबली ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि गरजूंना मदत या क्षेत्रात सातत्याने उचललेली पावले समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या सेवाकार्याबद्दल नागरिकांकडून सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या