सांगली, दि. ९ जुलै : महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून (चेन स्नॅचिंग) चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) सांगलीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे ११.०२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिराळा व कोकरूड परिसरातील दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
शिराळा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी मनिषा सुनील पाटील (रा. टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या २७ जून रोजी शिराळा गावात दुचाकीवरून जात असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेले होते. याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला.
तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान लक्ष्मण चंद्रकांत चालके (वय ३४, रा. चांदोली वसाहत, आटपाडी, ता. वाळवा, जि. सांगली) व अमित नानासो बुघावले (वय २७, रा. शाहापूर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मूळ गाव विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत आरोपींनी शिराळा व कोकरूड परिसरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ₹११,०२,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल यांचा समावेश आहे.
या कारवाईमुळे शिराळा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १२३/२०२६ तसेच कोकरूड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ३५/२०२६ यांची उकल झाली आहे. आरोपींना अटक करून पुढील तपास शिराळा पोलीस ठाण्यामार्फत सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच एलसीबी आणि शिराळा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या