प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दिनांक: ०९ जुलै २०२६: सांगली जिल्हा तसेच शहर परिसरातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सांगली येथील शासकीय जी.एन.एम. (पदविका) नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन (Upgradation) करून आता तिथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन 'बी.एस्सी. नर्सिंग पदवी महाविद्यालय' सुरू करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती सांगली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज माहिती दिली.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिनांक ८ जुलै, २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार, सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात हे महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह साकारणार असून, या पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी ३२.५७ कोटी रुपयांच्या एकूण अनावर्ती खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
सांगलीमध्ये हक्काचे शासकीय परिचर्या पदवी महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आपण वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे वेळोवेळी आणि सातत्याने लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता. नामदार मुश्रीफ साहेबांनीही या मागणीचे गांभीर्य ओळखून या प्रस्तावाला गती दिली, ज्यामुळे अखेर सांगलीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
या ऐतिहासिक निर्णयामध्ये सांगली येथील परिचर्या पदविका (GNM) महाविद्यालयाचे रूपांतर आता थेट परिचर्या पदवी (B.Sc. Nursing) महाविद्यालयात होणार असून दरवर्षी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल. 'Upgradation of Schools of Nursing to College of Nursing' या केंद्रीय योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या श्रेणीवर्धनासाठी रु. ७.०० कोटी इतक्या १००% केंद्र पुरस्कृत निधीला मंजुरी देण्यात आली आहे. वसंतदादा रुग्णालय आवारात ४,५०० चौ.मी. क्षेत्रफळाचे भव्य कॉलेज बिल्डिंग बांधली जाईल. यामध्ये आधुनिक नर्सिंग फाऊंडेशन लॅब, कॉम्प्युटर लॅब, प्रिको क्लिनिकल सायन्स लॅब, लायब्ररी, मल्टिपर्पज हॉल आणि स्वतंत्र सामायिक कक्ष असतील. यासाठी १८.३२ कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३,५०० चौ.मी. क्षेत्रफळाचे सुसज्ज वसतिगृह बांधले जाईल. यामध्ये इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या नियमांनुसार स्टडी रूम, रिक्रिएशन रूम, वॉर्डन रूम आणि डायनिंग हॉलसह किचनची उत्तम व्यवस्था असेल. या वसतिगृह बांधकामासाठी १४.२५ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे.
कॉलेजमधील विविध प्रगत प्रयोगशाळा (Labs) आणि तांत्रिक सुविधांसाठी ११ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे. महाविद्यालयाच्या कार्यालयीन व शैक्षणिक कामकाजासाठी ४० लाख रुपये किमतीचे वाहन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुसज्ज लायब्ररी आणि नवीन पुस्तकांच्या खरेदीकरिता ४० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.
वसंतदादा रुग्णालय आवारातील या दोन्ही इमारतींच्या (महाविद्यालय व वसतिगृह) बांधकामासाठी एकूण ३२.५७ कोटी व पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री व वाहनांसह ९१ लाख रुपयांचा खर्च असे एकूण ३३.४८ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले, "जागतिक आरोग्य व्यवस्थेत परिचारिकांचे (नर्सेस) महत्त्व कमालीचे वाढले आहे. सांगली हे दक्षिण महाराष्ट्राचे प्रमुख वैद्यकीय केंद्र (Medical Hub) म्हणून ओळखले जाते. सांगलीत बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय व्हावे, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने आणि विशेषतः वैद्यकीय शिक्षण विभागाने या मागणीची दखल घेत सांगलीला ही मोठी भेट दिली आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई पवार तसेच पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील आणि विशेष सहकार्य व मंजुरी दिल्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब यांचे सांगलीकरांच्या वतीने मनःपूर्वक आभार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मानले..
*तसेच सांगली येथे हे हक्काचे शासकीय परिचर्या पदवी महाविद्यालय मंजूर करून आणण्यासाठी आणि त्यासाठी ३३.४८ कोटी रुपयांचा भरीव निधी खेचून आणल्याबद्दल, सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव आणि डॉ. रुपेश शिंदे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना हसन मुश्रीफ साहेब आणि लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे विशेष आभार मानले आहेत...*
"या पदवी महाविद्यालयामुळे आणि नव्या भव्य बांधकामामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयाला अधिक सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल, ज्याचा थेट फायदा गरीब आणि गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यात होईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे सांगलीच्या वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे," असेही आमदार गाडगीळ यांनी नमूद केले....
- सुधीरदादा गाडगीळ (आमदार, सांगली विधानसभा)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या