सांगली प्रतिनिधी : जायंटस ग्रुप सांगली पर्लच्या पुरस्कृत जायंटस ग्रुप ऑफ चैतन्य सांगली या नूतन ग्रुपचा शपथविधी व पदग्रहण समारंभ वृद्ध सेवा आश्रम, सांगली येथे उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शंभरहून अधिक नागरिकांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास सेंट्रल कमिटी सदस्य ॲड. विलासराव पवार, फेडरेशन अध्यक्षा अनुजाताई पाटील, आयपीपी प्रशांत माळी, समन्वयक जया जोशी, युनिट डायरेक्टर गुंडूराव वसवाडे तसेच वृद्ध सेवा आश्रमाच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया आडमुठे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. सांगली पर्लच्या अध्यक्षा रंजना साठे यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. वृद्धाश्रमातील एका ज्येष्ठ महिला व एका ज्येष्ठ पुरुष यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नूतन ग्रुपच्या बॅनरचे अनावरण करण्यात आले.
युनिट डायरेक्टर गुंडूराव वसवाडे यांनी सदस्यांना शपथ दिली. स्मिता सुहास पंडित यांनी अध्यक्षपदाची, तर सही देशपांडे, शुभांगी बोली शेट्टी, रेशमा निकाळजे आणि सुनिता गौण यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून शपथ घेतली. ॲड. विलासराव पवार यांनी चार्टर प्रदान केले, तर आयपीपी प्रशांत माळी यांनी दिवा प्रदान केला.
यावेळी आयपीपी प्रशांत माळी यांनी सांगितले की, गेल्या आठ-नऊ वर्षांपासून जया जोशी यांनी सांगली जिल्ह्यात जायंटसची चळवळ सातत्याने वाढवत जवळपास दहा नवीन ग्रुप स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुजाताई पाटील यांनी जायंटसच्या कार्याची माहिती दिली, तर जया जोशी यांनी प्रत्येक सदस्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख करून दिली.
कार्यक्रमास २२ नवे सदस्य, सांगली पर्लच्या १० सदस्या आणि वृद्धाश्रमातील सुमारे ७० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी अशा सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमानंतर सर्व ज्येष्ठ नागरिकांना नाश्ता देण्यात आला. सूत्रसंचालन योजना गानमोघे यांनी, तर आभार प्रदर्शन वैशाली कुलकर्णी यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या