गगनबावडा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे तालुक्यातील बहुतांश ऊस आणि केळीची पिके भुईसपाट झाली असून ती कुजण्याच्या भीतीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. पारगावकरवाडी येथील शेतकरी गणपत तोरस्कर यांच्या केळीच्या बागेचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्या संपूर्ण गगनबावडा परिसर दाट धुक्याने आच्छादला आहे.
या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जलसाठे झपाट्याने भरले आहेत:
कोदे आणि वेसरफ हे लघुप्रकल्प आधीच १०० टक्के भरले असून, कोदे धरण क्षेत्रात आतापर्यंत तब्बल १७९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तिथून ६७५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कुंभी मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठाही ४९.२० टक्क्यांवर पोहोचला आहे.
अणदूर लघुपाटबंधारे तलाव आज (९ जुलै) सकाळी ६.०० वाजता १००% पूर्ण भरला आहे.
अणदूर धरण पूर्ण भरल्यामुळे कुंभी नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पाटबंधारे विभागाने (उत्तर) नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सुरक्षेसाठी धरण क्षेत्रात पर्यटकांना येण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या