पलूस, प्रतिनिधी : बांबवडे ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, पंचायत समिती पलूसचे गटविकास अधिकारी (BDO) राजेश कदम यांच्या दालनात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. निलंबित ग्रामसेवक हरिभाऊ जाधव आणि बांबवडेचे सरपंच यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, जोपर्यंत गुन्हा दाखल करण्याबाबत स्पष्ट निर्णय होत नाही तोपर्यंत दालनातून उठणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या वतीने ॲड. दीपक लाड आणि दीपक कदम यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. बांबवडे ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहाराबाबत झालेल्या चौकशीत ग्रामसेवक हरिभाऊ जाधव यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. मात्र, केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नसून संबंधित ग्रामसेवकासह सरपंचांवरही फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविलेल्या पत्रात निलंबित ग्रामसेवक हरिभाऊ जाधव यांनी कार्यालयीन कागदपत्रे परस्पर नेल्याचा उल्लेख केला असून, त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. या पत्रामुळे प्रकरणाला अधिक वेग आला आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला असून, दोषींवर फौजदारी कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले. या प्रकरणामुळे पंचायत समिती परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या