प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली जिल्ह्यातील नाट्य, चित्रपट, लोककला, संगीत, नृत्य, साहित्य, छायाचित्रण, दृकश्राव्य माध्यमे तसेच विविध कला प्रकारांतील कलावंत, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली येथील शासकीय विश्रामगृहात 'सांगली क्रिएटिव्ह आर्ट्स कौन्सिल' या जिल्हास्तरीय संघटनेची मोठ्या उत्साहात आणि दिमाखात स्थापना करण्यात आली. या नव्या कौन्सिलच्या अध्यक्षपदी मा. कुलदीप देवकुळे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीलाच मराठी नाट्यसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोहोचवणाऱ्या आणि अनेक दिग्गज कलाकारांना घडवणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि मार्गदर्शक मा. राजेंद्र पोळ हे होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगलीच्या समृद्ध कलावैभवाचा गौरवपूर्ण इतिहास अधोरेखित करताना सांगितले की, ५ जुलै १९१३ रोजी नटसम्राट बालगंधर्व यांनी 'गंधर्व नाटक मंडळी'ची स्थापना करून मराठी रंगभूमीला नवी दिशा दिली. योगायोगाने त्याच ऐतिहासिक दिवशी सांगली क्रिएटिव्ह आर्ट्स कौन्सिलची स्थापना होत आहे, हा अत्यंत शुभ संकेत असून या संस्थेच्या माध्यमातून सांगलीच्या सांस्कृतिक चळवळीला नवे बळ मिळेल.
ते पुढे म्हणाले की, कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजाला विचार देणारी, संस्कार घडवणारी आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारी शक्ती आहे. कलाकार जितका अभ्यासू, संवेदनशील, सर्जनशील आणि समाजाभिमुख असेल तितकाच तो मोठा होत जातो. मात्र प्रत्येक कलावंताने यश-अपयशात संयम, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी जपली पाहिजे. नव्याने स्थापन झालेल्या कौन्सिलला त्यांनी शुभेच्छा देत सर्व कला शाखांमध्ये समन्वय निर्माण करण्याचे आवाहन केले. यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सूचना, अनुभव सांगत नवा आशावाद व्यक्त केला. सुरवातीला स्वागत प्रास्ताविक कुलदीप देवकुळे यांनी केले. सूत्रसंचालन दिलावर शिकलगार यांनी तर आभार नूतन सचिव मारुती नवलाई यांनी मानले.
*सांगली क्रिएटिव्ह आर्ट्स कौन्सिलची कार्यकारिणी*
मार्गदर्शक : मा. राजेंद्र पोळ (सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत)
अध्यक्ष : मा. कुलदीप देवकुळे
कार्याध्यक्ष : मा. दिलावर शिकलगार (सुप्रसिद्ध स्टिल फोटोग्राफर व कॅमेरामन)
उपाध्यक्ष : मा. दीपक साळुंखे (दिग्दर्शक व फिल्ममेकर)
उपाध्यक्ष : मा. दयानंद आवळे
सचिव : मा. मारुती नवलाई
सहसचिव : मा. चंद्रकांत येवले
कोषाध्यक्ष : मा. धैर्यशील सूर्यवंशी
लोककलावंत प्रमुख : मा. अशोक रास्ते (सुप्रसिद्ध लेखक)
संपर्कप्रमुख : मा. सुरज वाघमोडे (नृत्य दिग्दर्शक व संस्थापक – फ्युजन डान्स अकॅडमी)
संपर्कप्रमुख : मा. सागर चौगुले (अभिनेता व दिग्दर्शक)
यावेळी सुप्रसिद्ध रेडिओ जॉकी व अभिनेते मा. विशाल कुलकर्णी, निर्माता मा. मंगेश पुजारी, अभिनेते-दिग्दर्शक मा. संजय रास्ते, शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष मा. संग्राम भोसले, चित्रपट लेखक-दिग्दर्शक मा. धैर्यशील सूर्यवंशी, अभिनेते मा. ओंकार येवले, मा. प्रशांत कुंभार, मा. विजयकुमार सुतार यांच्यासह नाट्य, चित्रपट, लोककला, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक कलावंत, तंत्रज्ञ, निर्माते आणि कला रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यातील सर्व कला शाखांना एकत्र आणून कलाकारांचे संघटन, परस्पर सहकार्य, नवोदितांना व्यासपीठ, कलावंतांच्या विविध प्रश्नांवर एकत्रितपणे काम करणे तसेच सांस्कृतिक चळवळीला अधिक व्यापक स्वरूप देणे, या उद्देशाने 'सांगली क्रिएटिव्ह आर्ट्स कौन्सिल' कार्यरत राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या