निलेश विठोबा गडदे
प्रतिष्ठा न्यूज सांगली, दि. ८ : सांगली शहरातील वेदांत मारुती बंडगार खून प्रकरणातील 'एन. जी. ग्रुप' या संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लागू करण्यात आला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली असून, ९ आरोपींसह एका बालकाविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख १) निलेश विठोबा गडदे, रा. वाघमोडे नगर, कुपवाड याने यातील टोळी सदस्य अ. क्र. २) किरण शंकर लोखंडे, वय २५ वर्षे, रा. वाघमोडे नगर, कुपवाड, ता. मिरज, ३) विशाल बिरुदेव चौगुले, पिंपळवाडी, पो. अग्रण धुळगांव, ता. कवठेमहांकाळ, ४) नानासो ऊर्फ सागर माणिक चौगुले, रा. पिंपळवाडी, पो. अग्रण धुळगांव, ता. कवठेमहांकाळ, ५) अतुल दादासो वायदंडे, वय २८ वर्षे, रा. खंडेराजुरी, ता. मिरज, जि. सांगली, ६) संदेश ऊर्फ सॅन्डी रामचंद्र घागरे, वय २३ वर्षे, मुळ रा. ढालगांव, ता. कवठेमहांकाळ, सध्या रा. चाणक्य चौक, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली, ७) बालक, ८) मलिक सलिम शेख रा. दत्तनगर, कुपवाड, ९) महमंद जमाल नदाफ, वय ४२ वर्षे, रा. अभयनगर, संजयनगर, सांगली, ता. मिरज, जि. सांगली, याशिवाय एका बालकाचाही समावेश आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या तपासात ही टोळी सांगली, मिरज, कुपवाड, जत, मिरज ग्रामीण, कवठेमहांकाळ तसेच कर्नाटक राज्यातील काही भागात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. सन २०१७ ते २०२५ या कालावधीत टोळीने स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर दुखापत, अपहरण, बेकायदेशीर शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.
या टोळीविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी तयार करून पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. प्रस्तावाची छाननी करून विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी मोक्का लागू करण्यास मंजुरी दिली.
या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) संदीप भागवत यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या