प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या तासगावकरांसाठी दिलासादायक बातमी आहे.कोयना धरण व कृष्णा नदीतील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाल्याने तासगाव नगरपरिषदेने शहरासह वासुंबे हद्दीतील एक दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा बंद करून बुधवार, दि. १५ जुलै २०२६ पासून पूर्वीप्रमाणे नियमित दररोज पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.नगरपरिषदेने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक आवाहनात म्हटले आहे की, मागील काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे जलस्रोतांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा सुधारली असून नागरिकांना आता नियमित वेळेत पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.मात्र,नियमित पाणीपुरवठा सुरू होत असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करावा,असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. गटारी, रस्ते, वाहने धुणे किंवा इतर अनावश्यक कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
पाणीटंचाईच्या काळात नागरिकांनी नगरपरिषदेला दिलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, भविष्यातही पाणी बचतीसाठी असेच सहकार्य करण्याची विनंती केली आहे.१५ जुलैपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, दैनंदिन पाणी व्यवस्थापनाचा ताणही कमी होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या