प्रतिष्ठा न्यूज |
राहुरी, दि. 24 जुलै : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला 'उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार' डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सांगली येथील क्रीडा शिक्षक प्रा. किशोर दत्तात्रेय चंदुरे यांना प्रदान करण्यात आला.
विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या हस्ते प्रा. चंदुरे यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कोल्हापूरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश कांबळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील, प्रा. गायकवाड तसेच राज्यातील विविध कृषी महाविद्यालयांतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी सातत्याने केलेले कार्य, विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील उल्लेखनीय योगदान आणि महाविद्यालयात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत प्रा. किशोर चंदुरे यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रा. चंदुरे यांनी या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. अनंत जोशी, डॉ. विश्राम लोमटे, प्रभारी प्राचार्य डॉ. अर्चना शिंदे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाला दिले.
प्रा. किशोर चंदुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या