कोल्हापूर प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी (आई अंबाबाई) मंदिरातील सुरू असलेल्या संवर्धन कामामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा प्रवक्ते सुनील सामंत यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, ठेकेदार, सल्लागार व अन्य दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाच्या नावाखाली ऐतिहासिक वारसा वास्तूचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंदिरातील ऐतिहासिक दगडी कारंजा हटविणे, मंजूर अटी व तांत्रिक निकषांचे उल्लंघन, तसेच वारसा संवर्धनाच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याची बाब गंभीर असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, मंजुरीपत्रे, मोजमाप पुस्तिका, छायाचित्रे, व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तात्काळ जप्त करून सुरक्षित ठेवावेत, तसेच मंदिराबाहेर हलविण्यात आलेल्या पुरातन मूर्तींचा शोध घेऊन त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. स्वतंत्र वारसा संवर्धन तज्ज्ञांकडून वैज्ञानिक तपासणी करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
तपास पूर्ण होईपर्यंत संवर्धनाच्या पुढील सर्व कामांना तात्काळ स्थगिती देण्यात यावी, जेणेकरून मंदिराच्या मूळ ऐतिहासिक स्वरूपाचे आणखी नुकसान होणार नाही, असेही सामंत यांनी नमूद केले आहे.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करून ८ ऑगस्टपूर्वी ठोस कारवाई करावी. अन्यथा ९ ऑगस्टपासून कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त करवीरवासीय व अंबाबाई भक्तांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशाराही सुनील सामंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सामंत यांनी हा लढा कोणत्याही वैयक्तिक अथवा राजकीय हेतूने नसून, आई अंबाबाई मंदिराचा ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक अस्मिता आणि भावी पिढ्यांचा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या