मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय 'शिक्षण संवाद' कार्यशाळा मुंबईतील चर्नी रोड येथील महाराष्ट्र जवाहर बाल भवन सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक, एससीईआरटीचे संचालक हेमंत वसेकर यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित होते.
कार्यशाळेची सुरुवात शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण या विषयांवरील मार्गदर्शनाने झाली. भारतीय प्रजासत्ताकाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले पद्मश्री उदयजी देशपांडे यांनी शालेय स्तरावर योग शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग हा अत्यंत प्रभावी घटक असल्याचे सांगितले. त्यांनी उपस्थितांना सोप्या आणि प्रात्यक्षिक पद्धतीने योगाची माहिती दिली.
राज्यातील शिक्षकांमध्ये लोकप्रिय असलेले सदाशिव वारे यांनी अध्ययन-अध्यापनातील नाविन्यपूर्ण प्रयोग, शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन, विद्यार्थ्यांमधील सहकार्याची भावना आणि प्रभावी अध्यापन पद्धती यावर मार्गदर्शन केले.
ह.भ.प. उमेश महाराज बागडे यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात अध्यात्माचे महत्त्व अधोरेखित करत संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील विचारांचा शिक्षण प्रक्रियेत उपयोग कसा होऊ शकतो, याची उदाहरणांसह मांडणी केली.
लेफ्टनंट कर्नल सतेस हंगे आणि एअर व्हेटरन विंग कमांडर एम. याग्नारामन यांनी शालेय स्तरावर सैनिकी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, राष्ट्रप्रेम, शिस्त आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी शिक्षक परिषदेच्या 'राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित आणि शिक्षकहित' या चतुःसूत्रीचा आधार घेत राष्ट्रीय चारित्र्य निर्मिती, योग, संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण, अभ्यासक्रम, व्यावसायिक कौशल्य विकास तसेच शिक्षकांच्या विविध अडचणी आणि उपाययोजनांवर आपले विचार मांडले.
लेखक संजय कळमकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला आणि क्रीडाचे महत्त्व खुमासदार शैलीत उलगडून सांगितले, तर बालनाट्यकार राजीव तुलालवार यांनी बालअभिनय आणि सर्जनशीलतेच्या विकासासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.
उपसंचालक संजय डोर्लीकर यांनी शालेय स्तरावर 'लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान' प्रभावीपणे राबविण्याबाबत माहिती दिली. तसेच उपसंचालिका वंदना वाहुळ यांनी शिक्षण विभागाच्या विविध शासकीय योजना, सद्यस्थितीतील आव्हाने आणि उपलब्ध संधी यांचा आढावा घेतला.
कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तर आणि शंकानिरसन सत्र आयोजित करण्यात आले. उपस्थित शिक्षकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना शिक्षण आयुक्त, संचालक आणि उपसंचालकांनी सविस्तर उत्तरे देत मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने राज्यस्तरीय 'शिक्षण संवाद' कार्यशाळेची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या