सांगली प्रतिनिधी : सांगली (जिल्हा) नगरवाचनालया तर्फे व डॉ. गणेश लिमये यांच्या आर्थिक सहकार्यातून शालेय विद्यार्थांसाठी उन्हाळी सुट्टीत आयोजित केलेल्या कै. भा. का. लिमये स्मृती “जास्तीत जास्त पुस्तके वाचा स्पर्धेचा” बक्षीस समारंभ ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सुभाष कवडे यांच्या उपस्थितीत व डॉ. रोहन ठाणेदार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना श्री. कवडे म्हणाले - ग्रंथालय हे मन आणि बुद्धी स्वच्छ करण्याचे ठिकाण आहे. पुस्तके ही ज्ञानाबरोबरच माणसाला शहाणं बनवतात.
अगदी लहानपणापासून पुस्तकांशी मैत्री केली की पुढील आयुष्यात ती आपल्याला पथदर्शी ठरतात.
मुलांनी संत साहित्य, महापुरुषांची चरित्रे, त्यांची आत्मकथने वाचावीत. त्यांचे विचार आत्मसात करण्याचे प्रयत्न करावेत. कोणतेही पुस्तक जात, धर्म, पंथ, लिंगभेद शिकवत नाही. पुस्तके ही व्यक्तिमत्त्व विकास घडवतात. वाचनाने विद्यार्थांचे डोळे सुंदर होतात, दृष्टी सुंदर होते, आदर्शाची शोध घेण्याची वृत्ती जोपासणारी दृष्टी यायला हवी. वाचनाने संस्कृती समजते. मनाची शुद्धता करणारी संस्था म्हणजे पुस्तके होय.
या समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. ठाणेदार म्हणाले- एक पुस्तक एका माणसाला भेटल्यासारखे आहे. पुस्तकांतून चांगले मित्र चांगली संगत लाभते. मुलांनी फक्त पुस्तकं न वाचता त्यामागील संदर्भ शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरून संदर्भ ग्रंथ वाचन होईल.
फक्त स्पर्धेपुरते वाचन न करता सातत्याने विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांनी हाताळायला हवी आहे आणि पालकांनी ही आपल्या मुलांना या बाबतीत योग्य प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर रहायला हवे.
पुस्तक वाचण्याचा छंद हा कायम आनंद देणारा,विचार परिपक्व करणारा, आणि व्यक्तिमत्त्व विकास करणारा असतो असे मौलिक विचार त्यांनी मांडले.
स्पर्धा निकाल :- या स्पर्धेत एकूण ६४ विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सुबोध जोशी व श्री. दीपक पाटील यांनी केले.
लहान गट इ. ४ ते ७ वी :- प्रथम क्रमांक - कु.प्राची प्रदीप पिंजारी, द्वितीय क्रमांक - कु. नित्यश्री युवराज भोसले, तृतीय क्रमांक - चि. श्रीराम सूर्यकांत मराठे, मोठा गट इ. ८ वी ते १० वी :- प्रथम क्रमांक चि. रोहन मंगेश सांतूरकर, द्वितीय क्रमांक कु. श्रीनिधी सचिन ताम्हनकर, तृतीय क्रमांक कु. सनुजा संतोष पाटील
यानिमित्ताने नुकत्याच झालेल्या ‘सनदी लेखापाल’ (C.A.) परीक्षेत देशात ३७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सांगलीचे सुपुत्र श्री. ईशान विलास वाडेकर तसेच जलद बुध्दिबळ स्पर्धेत फिडे मानांकन प्राप्त केल्याबद्दल आणि इ. ५ वीच्या शिष्यवृत्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळवणाऱ्या चि. अर्जुन अभिजित सोहनी याचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. विकास जोशी, उपाध्यक्षा सौ. शुभदा पाटणकर, कार्यवाह श्री. सुहास करंदीकर, सहकार्यवाह श्री. मुकुंद पटवर्धन व पदाधिकारी तसेच पालक विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गायत्री कुलकर्णी व सौ. शर्मिला पाठक यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या