प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली : पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगलीच्या रेड क्रॉस युवा क्लब आणि डीकेएमएस स्टेम सेल रजिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक व पालकांसाठी स्टेम सेल जनजागृती सत्र तसेच स्टेम सेल दाता नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला शिक्षक आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रक्ताच्या कर्करोगासह विविध गंभीर रक्तविकारांवरील उपचारांसाठी अधिकाधिक स्वेच्छा स्टेम सेल दाते तयार व्हावेत, या उद्देशाने अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमात स्टेम सेल दानाचे महत्त्व, दाता होण्यासाठीची पात्रता, नोंदणीची सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया याबाबत विद्यालयाचे प्राचार्य जी. बी. पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
अभियानादरम्यान एकूण १८१ जणांनी स्टेम सेल दाता म्हणून स्वेच्छेने नोंदणी केली. यामध्ये १५६ पालक आणि २५ शिक्षकांचा समावेश आहे. समाजोपयोगी उपक्रमात मिळालेला हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
शाळेच्या प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली रेड क्रॉस युवा क्लबचे सदस्य आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी नोंदणी प्रक्रिया, नियोजन व समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य जी. बी. पाटील यांनी अधिकाधिक नागरिकांनी अशा जीवनदायी उपक्रमात सहभागी होऊन स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या