मुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अवैध कॅफे शॉप्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे प्रमुख नितीन चौगुले यांनी पावसाळी अधिवेशन 2026 दरम्यान विधानभवन येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात राज्यातील काही कॅफे शॉप्समध्ये अल्पवयीन मुला-मुलींना अश्लील व अनैतिक वर्तनासाठी स्वतंत्र कंपार्टमेंट्स व झोन उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात अशा कॅफेंशी संबंधित चार अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची प्रकरणे, कोल्हापूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटना तसेच जळगावमध्ये कॅफेमधील अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा उल्लेख करून संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्याची माहितीही देण्यात आली.
शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानने गेल्या चार वर्षांपासून या विषयावर जनजागृती मोहीम राबविल्याचे चौगुले यांनी सांगितले. 2024 मध्ये सांगलीतील काही कॅफेंविरोधात आंदोलन करण्यात आले होते. तसेच 19 जून 2026 रोजी पोलिस प्रशासन आणि प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या उपस्थितीत शहरातील अनेक कॅफेंवर धाड टाकण्यात आली. यावेळी अनेक कॅफेंमध्ये कंपार्टमेंट्स हटविण्यात आले असून कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या आढळल्याचा दावा करण्यात आला. या कारवाईनंतर 7 ते 8 कॅफेंविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली.
यावेळी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेली कॅफे शॉप्ससाठीची 16 कडक नियमांची नियमावली संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावी, तसेच राज्यातील सर्व अवैध कॅफे शॉप्स कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यासंदर्भातील सर्व माहिती गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना देण्यासाठी पत्र पाठवले असून, या विषयाचा मुख्यमंत्री स्तरावरही पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही दिल्याचे नितीन चौगुले यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या