लोकशिक्षण मंडळ, सांगली संचलित देशभक्त नाथाजी लाड विद्यालय, विश्रामबाग येथे विद्यार्थ्यांसाठी "ताण-तणाव व अभ्यासाचे तंत्र" या विषयावरील मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात ताण-तणाव व्यवस्थापन तज्ज्ञ सुरेश खांडेकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, ध्येय निश्चिती आणि मानसिक ताणावर प्रभावीपणे मात करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. त्यानंतर सरस्वती माता आणि देशभक्त नाथाजी लाड यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिणी कुलकर्णी यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय शुभदा पवार यांनी करून दिला.
मार्गदर्शन करताना सुरेश खांडेकर म्हणाले की, विशिष्ट, मोजता येणारे, साध्य करता येणारे, वास्तववादी आणि निश्चित कालमर्यादेतील ध्येय ठरवून त्यासाठी नियोजनबद्ध व सातत्यपूर्ण परिश्रम घेतल्यास यशाचे शिखर गाठता येते. जीवनातील ध्येय स्पष्ट असणे, त्यासाठी कृती आराखडा तयार करणे आणि ताण-तणावावर योग्य पद्धतीने मात करणे ही यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणे देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले नितेश पवार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ताण-तणावावर मात करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत पालकांनी मुलांना सकारात्मक वातावरण व भावनिक आधार देण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या संचालिका कमल लाड, आदिती लाड, आशा लाड, मुख्याध्यापक सचिन लाड, लठ्ठे पॉलिटेक्निक कॉलेजचे निवृत्त प्राचार्य वसवडे सर, जायंट्स ग्रुप ऑफ सांगलीचे संदीप कोळी तसेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी कुलकर्णी यांनी केले, तर आभार नवशिक्षण मंदिरचे मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या