सांगली, प्रतिनिधी : बँक राष्ट्रीयकरण दिनानिमित्त महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या सांगली जिल्हा सदस्यांच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. बँक ऑफ इंडियाच्या आरसेटी (RSETI) इमारत परिसरात झालेल्या या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
१९ जुलै १९६९ रोजी देशातील प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. या ऐतिहासिक निर्णयामुळे बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या. ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळाली, शेती, लघुउद्योग व दुर्बल घटकांना कर्जपुरवठा वाढला आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर (LDM) कॉ. निखिल सावळे तसेच आरसेटीचे प्रभारी कॉ. महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. उमेश खोत, बँक ऑफ इंडियाचे कॉ. सचिन पाटील, युको बँकेचे कॉ. हेमंत कोरे व कॉ. विनायक कदम, रत्नाकर बँकेचे कॉ. सागर पाटील, कॉ. शरद मालगावे, कॉ. सुनील भगाटे, कॉ. महेश मसुटगे तसेच कॉ. सतीश जीवापगोळ यांनी सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी, "बँक राष्ट्रीयकरणामुळे आर्थिक समावेशनाला बळ मिळाले आणि समाजातील सर्व घटकांना बँकिंग सुविधांचा लाभ मिळाला. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे," असा संदेश दिला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या