प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 20 : महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या धरण क्षेत्रात तसेच मुक्त पाणलोट क्षेत्रात सध्या चांगला पाऊस होत असून आगामी काळात नदीच्या प्रवाहात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने कर्नाटक शासनास आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. ही माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दि. 20 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजता हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी 522.60 मीटर असून आवक 36,400 क्युसेक्स तर जावक 34,450 क्युसेक्स आहे. बॅरेजमध्ये 3.98 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी 3.18 टीएमसी उपयुक्त व 0.80 टीएमसी मृत साठा आहे. को. प. बंधारा राजापूर येथील पाणीपातळी 524.483 मीटर असून तेथून 35,208 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आंतरराज्य समन्वय बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मान्सून कालावधीत कृष्णा नदी प्रवाहीत राहण्यासाठी हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत, अशी विनंती कर्नाटक प्रशासनास पुन्हा करण्यात आली आहे.
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयानुसार ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.00 ते 517.50 मीटर दरम्यान राखण्याचीही विनंती करण्यात आली आहे. सध्या अलमट्टी धरणाची पाणीपातळी 517.680 मीटर असून धरणात 40,173 क्युसेक्स आवक व 16,458 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गतवर्षांच्या अनुभवावरून जुलै महिन्याच्या अखेरीस व ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्जन्यमानाचे प्रमाण जास्त असते. सन 2026 मध्ये अलनिनोचा प्रभाव सक्रिय झाल्यामुळे काही भागांत दुष्काळ तर काही भागांत अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी झाल्यास कृष्णा नदी प्रवाहीत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने आंतरराज्य बैठकीतील निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कर्नाटक शासनाकडून नेहमीप्रमाणे सकारात्मक सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की सांगलीकरांच्या पोटात गोळा येतो.पूर येणार की महापूर.त्या म्हणीप्रमाणे नेमेचि येतो मग पावसाळा आणि त्या पाठोपाठ कृष्णा नदीला पूर इ.इ.आज इतकी वर्षे हे चालू आहे परंतु यावर काही उपाय काढावा असे कोणत्याही सरकारला किंवा लोक प्रतिनिधीला वाटले नाही.किवा लोकांनाही त्याबद्दल काही वाटत नाही हे पण विशेष आहे.सतत सगळ्यांनी अलमट्टीच्या आणि कर्नाटक सरकारच्या नावाने बोंब मारायची हेच रुटीन होऊन बसले आहे परंतु येथे एक गोष्ट कुणीही का लक्षात घेत नाही की सांगली साताऱ्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस होत असताना पूर्व भागात विशेषतः जत आटपाडी किंवा माण खटाव तालुक्यात लोक पावसाची वाट पाहत असतात.आता सुद्धा कृष्णा नदीला बऱ्यापैकी पाणी वाहून जात आहे.हे सगळे पाणी फुकट कर्नाटकात वाहून जात आहे.अलमट्टी मध्ये भर पडत आहे.नंतर पूर येऊन सांगली व शिरोळ तालुका पाण्याखाली जाण्याआधी हे व्यर्थ जाणारे पाणी उचलून जत आटपाडी किंवा माण खटाव सारख्या दुष्काळी तालुक्यात का टाकले जात नाही.हे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात टाकून तेथील बांध बंधारे भरून घेतले तर तेथील जमिनीत पाणी होऊन तेथील दुष्काळ हटवण्यास मदत होईल आणि पश्चिम भागात पूर नियंत्रणास मदत होईल.परंतु मग आजपर्यंत कोणत्याही सरकारने किंवा लोकप्रतिनिधींनी हे का केले नाही तर या मागे फक्त आणि फक्त राजकारण आहे.जनतेला सुख दिले तर पुढाऱ्यांची काय किंमत राहिली या एका क्षुद्र विचाराने हे घडत नाही असे माझे मत आहे.दुर्देवाची गोष्ट ही आहे की त्या दुष्काळी भागातील लोकांना पण असे वाटत नाही.ते दु:ख सहन करतील पण आपले भले कशात आहे याचा विचार ते करणार नाहीत.त्याहून दुर्दैवाची बाब म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजे पत्रकारांना किंवा मिडियाला पण तसे वाटत नाही.या सर्वांना फक्त पुराचे आणि नेत्यांचे फोटोसेशन आणि सनसनाटी बातम्या देण्यातच रस आहे.
उत्तर द्याहटवा