वारणाली हॉस्पिटल सांगली महापालिकेकडेच राहाणार ; खासगीकरणाचा प्रश्न नाही : आमदार सुधीर गाडगीळ
By -
जुलै १४, २०२६
0
प्रतिष्ठा न्यूज
सांगली, प्रतिनिधी : वारणाली येथील महापालिकेच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येणार नसून ते पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या ताब्यात राहणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या घरपट्टी वसुली मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ९० टक्के नागरिक समाधान व्यक्त करत असल्याचेही त्यांनी सांगितले. उर्वरित प्रश्नही लवकरच सोडविण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार गाडगीळ म्हणाले की, वारणाली हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी यापूर्वी करण्यात आलेला करार आता संपुष्टात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल; मात्र रुग्णालय कोणत्याही खासगी संस्थेला देण्याचा निर्णय झालेला नाही. नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच महापालिकेचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रुग्णालयाच्या दुरुस्ती व आवश्यक सुविधांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले असून मंजुरी मिळाल्यानंतर कामे हाती घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले. हाऊस चेंबर, ड्रेनेज लाईन व इतर पायाभूत सुविधांसंदर्भातील प्रस्तावांचाही शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, संत वासराम केक्कर महाराज शॉपिंग सेंटरमधील काही गाळ्यांच्या विक्रीबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. संबंधित गाळ्यांच्या विक्रीचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून महापालिकेच्या नियमांनुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या