सांगली, दि. १५ जुलै : सांगली शहरातील कृष्णा नदीकाठच्या स्वामी समर्थ घाट परिसरात चैतन्य देवा तोरणे (वय २०, रा. नवीन वसाहत, टिंबर एरिया, सांगली) या तरुणाची ३ ते ४ जणांच्या टोळीने कोयता व धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१४ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चैतन्य तोरणे हा स्वामी समर्थ घाट परिसरात बसला असताना संशयित हल्लेखोर तेथे आले. त्यांची चाहूल लागताच चैतन्यने नदीकाठाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा चित्रपटातील दृश्याप्रमाणे पाठलाग करत त्याला गाठले आणि कोयता तसेच धारदार शस्त्रांनी त्याच्यावर सपासप वार केले.
हल्लेखोरांनी डोक्यावर, मानेवर आणि पोटावर सुमारे आठ ते नऊ वार केल्याने चैतन्य गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
प्राथमिक पोलीस तपासात या हत्येमागे जुने वैमनस्य आणि वर्चस्ववादाचे कारण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. संशयित आरोपी आणि चैतन्य हे पूर्वी मित्र असल्याचे समोर आले असून, किरकोळ वादानंतर दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. त्यानंतर चैतन्यने स्वतःची टोळी तयार करण्यास सुरुवात केल्याने दोन्ही गटांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू झाल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
दरम्यान, ऑगस्ट २०२३ मध्ये गोकुळनगर येथे झालेल्या विनोद किसन इंगळे खून प्रकरणाशीही या हत्येचा संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या प्रकरणातील जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल रुग्णालयात आणि घटनास्थळी नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली. रात्री उशिरा संतप्त जमावाने एका संशयित आरोपीच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विश्रामबाग पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) अतिरिक्त बंदोबस्त स्वामी समर्थ घाट व सिव्हिल रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणातील चौघेही संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या अटकेसाठी शहर पोलीस, विश्रामबाग पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची (एलसीबी) तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, या खूनप्रकरणामुळे सांगली शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या