सांगली प्रतिनिधी : पंचमुखी मारुती मंदिर रोड, खवभाग येथील ऑमिसन जेनेरिकार्ट मेडिसिन स्टोअर यांच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त विवेकानंद रुग्णालय, बामणोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या नगरसेविका मा. सौ. स्वाती शिंदे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बोलताना नगरसेविका स्वाती शिंदे म्हणाल्या की, "निरोगी नागरिक हाच समाजाच्या विकासाचा पाया आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, डोळ्यांचे विकार आणि इतर जीवनशैलीशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे लवकर निदान करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा ही उपचारापेक्षा अधिक परिणामकारक असते. अशा आरोग्य शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांनाही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला व आरोग्य सुविधा सहज उपलब्ध होतात. समाजहितासाठी राबविण्यात येणारे असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असून नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."
त्या पुढे म्हणाल्या की, आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी समाज घडविण्यासाठी शासन, वैद्यकीय संस्था आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज आहे. आरोग्याबाबत जनजागृती, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार यामुळे अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळविता येते.
या शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, गरजूंना मोफत चष्मे वाटप तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिराचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी ऑमिसन जेनेरिकार्ट मेडिसिन स्टोअरचे संचालक श्री. निनाद गोसावी व सौ. आत्मजा गोसावी, विवेकानंद रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमास भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी सौ. अपर्णा गोसावी, ॲड. शैलजा पंडित, सौ. जयश्री मोहिते यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानले. या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या