मुंबई, दि. १७ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. मंगळवारी उशिरा रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. यास शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.
या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हेही उपस्थित असल्याची चर्चा असून, राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्षीय समीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
दरम्यान, जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटामध्ये प्रवेश करून एनडीएत सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी संबंधित नेत्यांकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या सर्व घडामोडी सध्या केवळ राजकीय चर्चेच्या पातळीवर असल्याचे मानले जात आहे.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले असून, शरद पवार यांची पुढील भूमिका आणि जयंत पाटील यांचा निर्णय याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे. अधिकृत घोषणा होईपर्यंत या चर्चांकडे सावधपणे पाहण्याची गरज असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो असल्याचे स्पष्टीकरण आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या