प्रतिष्ठा न्यूज | अनिल शिंदे
सावळज, दि. २३ : दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ तासगाव तालुक्यातील सावळज येथे गुरुवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने गावात निषेध फेरी काढून केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
सावळज येथील कुत्रा पाटीपासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या निषेध फेरीत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी बोलताना सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे गटनेते ॲड. विजय धेंडे यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध करत, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीहल्ला हा लोकशाही मूल्यांवर आघात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकारवर हुकूमशाही वृत्तीचा आरोप केला. देशातील शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न, वाढती महागाई, पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचे सांगत, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार सरकार दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी जंतर-मंतर आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील दाखल गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाला सावळज येथील डॉक्टर संघटनेनेही जाहीर पाठिंबा दिला. डॉ. संदीप तारळेकर यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त करत लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, निषेध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सावळज गावात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून बहुतांश व्यापारी आस्थापने दिवसभर बंद ठेवण्यात आली.
या आंदोलनात सांगली जिल्हा परिषद सदस्य ॲड. विजय धेंडे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रवीण धेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच रमेश कांबळे, माजी उपसरपंच संजय थोरात, अण्णासाहेब कांबळे, डॉ. प्रताप थोरात, डॉ. अभिजित जाधव, डॉ. संदीप तारळेकर, अनिल शिंदे, राहुल कलाल, अमित कांबळे, राजू गायकवाड, रवी शिंदे, सामाजिक कांबळे, सिद्धनाथ जाधव यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या