प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 23 : महाराष्ट्राचे हरित आच्छादन सन 2047 पर्यंत 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी '300 कोटी वृक्षारोपण अभियान (सन 2026–2047)' अंतर्गत सांगली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 15 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक 25 जुलै 2026 रोजी जिल्हाभर व्यापक वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनी यांनी आपल्या क्षेत्रात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांगली जिल्हा वृक्षलागवड समितीने केले आहे.या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यात सन 2026 च्या पावसाळ्यात १५ लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले असून, या उद्दिष्टामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभाग, महसूल विभाग, कृषी / फलोत्पादन विभाग, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, नगरविकास विभाग, उद्योग विभाग, जलसंपदा विभाग, मृद व जलसंधारण विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, सार्वजनीक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, सहकार विभाग, वस्त्रोद्योग विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी प्रसाधन विभाग व इतर यंत्रणा यांचा समावेश आहे.
सर्व विभागाकडून रोपलागवडीच्या अनुषंगाने पुर्वतयारी करण्यात आली आहे. दिनांक 25 जुलै रोजी सर्व विभागामार्फत जिल्हास्तर / तालुकास्तर / ग्रामस्तरावर वृक्षलागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. 300 कोटी वृक्षारोपण अभियान हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून त्याद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्वाची कार्यवाही होणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता शासकीय यंत्रणेबरोबरच सर्व नागरिक, स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी, विद्यार्थी यांचा समावेश आवश्यक आहे. शासकीय यंत्रणा व इतर वृक्षप्रेमी तथा सामाजिक संस्था यांनी केलेल्या वृक्षलागवडीची माहिती अमृतवृक्ष या ॲपद्वारे नोंदवून आपला सक्रीय सहभाग दर्शविण्यात यावा, असे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरूडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या