सांगली दि.३. "शिक्षकांनी नव्या काळाची पाऊले ओळखून अद्यावत असलं पाहिजे. ज्ञानसमृद्ध असलं पाहिजे. नवी अध्ययन-अध्यापन तंत्रे आत्मसात करून विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावं. ज्ञानाबरोबरच सुसंस्कारी विद्यार्थी घडला, तरच राष्ट्र बलवान होईल. मुलांचे मानसशास्त्र समजून घेणारा शिक्षकच विद्यार्थ्याला आपला वाटतो. ज्ञानसमृद्ध, प्रयोगशील शिक्षकच समाजसमृद्धीचा शिल्पकार ठरतो." असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर यांनी 'शिक्षक-समृद्धी' कार्यशाळेत 'बदलते शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका' या विषयावर मार्गदर्शन करताना केलं.
न्यू एज्युकेशन सोसायटीच्या ८६ व्या वर्धापन दिनी 'शिक्षक समृद्धी' कार्यशाळेमध्ये ते बोलत होते.
या कार्यशाळेमधे दुसऱ्या सत्रात माजी शिक्षणाधिकारी व साहित्यिक नामदेव माळी यांनी 'समृद्ध शिक्षक' या विषयावर मार्गदर्शन केले . याप्रसंगी ते म्हणाले, "शिक्षकाची नोकरी सन्मानाची आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार, आवडीनुसार त्याला शिकायला प्रवृत्त करणारे शिक्षक नेहमीच आदरस्थानी राहतात. शिकण्याचा प्रारंभ भाषेतून होतो. म्हणून विद्यार्थ्यांचा भाषा विकास होणे अत्यंत गरजेचे असते.त्याला भाषा चांगली आली की, त्याचे इतर सर्व विषयही पक्के होण्यास सुलभ होते. भाषेमुळे मुलांचे वाचन, लेखन, संवाद कौशल्य सुधारते. भावनिक विकास होतो. आत्मविश्वास वाढतो. संघटन कौशल्य व नेतृत्वविकासही होतो. गणितासारख्या विषयांमुळे तर्कशक्तीचा विकास होतो. विज्ञानामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून, चिकित्सक वृत्ती व प्रयोगशीलता वाढते. कृतीयुक्त शिक्षणामुळे विद्यार्थी अध्यापनात अधिक रमत असतात. त्यामुळे या परिणामकारक तंत्राचा वापर अध्यापनात शिक्षकांनी जरूर करावा".
अध्यक्षस्थानी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. शांतिनाथ कांते हे होते.
स्वागत मुख्याध्यापक सुहास कोळी यांनी केले. प्रास्ताविक विठ्ठल मोहिते यांनी तर सुवर्णा गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे संचालक श्रीप्रसाद चौगुले, विजया पाटील, राजेंद्र मेंच, सुरेंद्र पाटील, सुनील भावे, बिरू एडके, पंकज आळवेकर , राजकुमार हेरले आदी संचालकांसह सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या