प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : येथील परशुराम विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधत, गगनबावडा पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) पत्र लिहून ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
इंग्रजीच्या शिक्षकांअभावी निकालाला फटका
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १२ वीच्या परीक्षेत परशुराम विद्या मंदिर व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील एकूण ४९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अनुत्तीर्ण झालेल्या या ५ विद्यार्थ्यांना इतर सर्व विषयांमध्ये ८०% ते ९०% गुण आहेत, मात्र इंग्रजी विषयात केवळ २२% ते २५% गुण मिळाल्यामुळे ते नापास झाले. यामुळे शाळेचा एकूण निकाल ८९.७९% इतका खालावला आहे.
शाळेत इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांवर ही वेळ आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजीच्या शिक्षिका श्रीम. कल्पना पावरा या निलंबित असल्याने आजअखेर शाळेत गैरहजर आहेत. त्यामुळे कागदोपत्री हे पद भरलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात ते रिक्तच आहे.
५ पदे रिक्त, ३ वर्षांपासून इंग्रजीचे पद रिकामे
शाळेतील एकूण मंजूर व रिक्त पदांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
माध्यमिक विभाग: एकूण ११ पदे मंजूर असून सध्या केवळ ०६ शिक्षक कार्यरत आहेत, तर ०५ पदे रिक्त आहेत.
ज्युनिअर कॉलेज: एकूण ०५ पदे मंजूर असून ०४ कार्यरत आहेत. यामध्ये इंग्रजी विषयाचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे.
५२९ विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये शाळेत एकूण ५२९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेने या गंभीर बाबीची दखल घेऊन सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी आग्रही विनंती लोकप्रतिनिधींनी केली आहे.
या पत्रावर गगनबावडा पंचायत समितीच्या सभापती सौ. छाया प्रकाश देसाई, उपसभापती श्री. राजेश भगवान पाटील, सदस्य श्री. अमर केशव कांबळे आणि सौ. शुभांगी कुंडलिक सकपाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या