सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला साजेसा सन्मान मिळावा आणि त्यांच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यात, सांगली शहरात भव्य पूर्णाकृती पुतळा तसेच सर्व सुविधांनी युक्त प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, या मागणीचे सविस्तर निवेदन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री यांना शिवसेना शिव उद्योग सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे आणि जागतिक साहित्यविश्वाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक विचारांद्वारे त्यांनी शोषित, वंचित, कष्टकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला शब्द दिले. समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये त्यांनी आपल्या लेखणीतून प्रभावीपणे मांडली. त्यांचे साहित्य अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाले असून आजही त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला दिशा देत आहे.
अशा महान व्यक्तिमत्त्वाची जन्मभूमी असलेल्या सांगली जिल्ह्यात, सांगली शहरात आजही त्यांच्या कार्याला साजेसा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी स्मारक नसणे ही खेदजनक बाब असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. देशभरातील अनेक महापुरुषांची भव्य स्मारके उभारण्यात आली आहेत; मात्र मराठी साहित्याला जागतिक स्तरावर नेणाऱ्या आणि सामाजिक परिवर्तनाची मशाल प्रज्वलित करणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीत त्यांना योग्य तो सन्मान मिळालेला नाही, अशी भावना समाजात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
सांगली शहरात उभारण्यात येणारे स्मारक हे केवळ दगड-मातीचे बांधकाम न राहता सामाजिक समता, मानवता, संविधानिक मूल्ये आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रेरणास्थान व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या स्मारकात डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य, जीवनकार्य, शाहिरी, लोककला, संशोधन केंद्र, वाचनालय, संग्रहालय, अत्याधुनिक सभागृह तसेच विद्यार्थ्यांसाठी, संशोधकांसाठी आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी विविध उपक्रम विकसित करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनाची दखल घेत मा. ना. रामदास आठवले यांनी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत सांगली जिल्हाधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच शासन आणि प्रशासकीय स्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येईल. असा शब्द त्यांनी दिला.
यावेळी आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. जग्गनाथ दादा ठोकळे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. संजय कांबळे, शिवसेना शिव कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मा. संजय मोरे तसेच साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी सांगली शहरात साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि प्रेरणादायी स्मारक उभारणे ही केवळ एका समाजाची मागणी नसून मराठी साहित्य, लोककला, सामाजिक न्याय आणि मानवतेचा गौरव करणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीच्या जिल्ह्यात त्यांच्या कार्याला साजेसा सन्मान मिळावा, ही काळाची गरज असून शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या