कुंडल (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या पार्श्वभूमीवर आज कुंडल परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती व बाधित शेतकऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त करत हा प्रकल्प केवळ शेतीपुरता मर्यादित नसून पर्यावरण, धार्मिक स्थळे, वस्ती आणि स्थानिकांच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सर्व बाधितांनी एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समितीच्या माहितीनुसार, प्रस्तावित महामार्गामुळे कुंडल गावातील सुमारे ६६० एकर, तर घोगाव परिसरातील सुमारे २८५ एकर जमीन बाधित होणार आहे. विशेष म्हणजे या भागातील बहुतांश जमीन काळी, कसदार आणि अत्यंत सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. जमिनीचे योग्य मूल्य मिळणार नाही, तसेच पिढ्यानपिढ्या जोपासलेली शेती कायमची हिरावली जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शक्तिपीठ महामार्गामुळे केवळ शेतीच नव्हे तर कुंडल परिसरातील नैसर्गिक संपत्तीवरही परिणाम होणार असल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. सह्याद्रीच्या रांगेतील शेवटचा मानला जाणारा कुंडलचा डोंगर, त्यालगतची हिरवीगार वनराई, जवळील सागरेश्वर अभयारण्य आणि कृष्णा नदीचा निसर्गरम्य परिसर हा या भागाचा अभिमान असून या सर्वांवर या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असे समितीचे म्हणणे आहे.
याशिवाय गट क्रमांक १७३ व १७८ मधील फुलेनगर ही वस्ती देखील बाधित होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ठिकाणी सुमारे ३६५ घरे असून क्रांती अग्रणी जी. डी. (बापूसाहेब) लाड यांनी १९९७ मध्ये सर्वसामान्य नागरिकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. त्यावेळी तासगाव तहसील कार्यालयामार्फत गावठाण हद्दीत घरे बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. अनेक वर्षांपासून येथे नागरिक वास्तव्यास असून आता त्यांच्यासमोर विस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
संघर्ष समितीच्या माहितीनुसार, घाटगे फुलालगत असलेली मुस्लिम समाजाची दफनभूमीही या प्रकल्पामुळे बाधित होऊ शकते. तसेच कुंडल डोंगरावरील वीरभद्र मंदिर, पार्श्वनाथ जैन तीर्थक्षेत्र आणि परिसरातील धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
संघर्ष समितीने नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, ही केवळ काही शेतकऱ्यांची लढाई नसून संपूर्ण गावाच्या अस्तित्वाची लढाई आहे. जात, धर्म, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आपल्या मातीसाठी, शेतीसाठी, पर्यावरणासाठी आणि भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात जमीन कायमची संपादित होण्याचा धोका असल्याचा दावा समितीने केला आहे.
येत्या एक-दोन दिवसांत कुंडल येथे सर्व बाधित शेतकरी, नागरिक आणि ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीत प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येईल तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे. सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहून आपली मते व सूचना मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व करणारे ॲड. दीपक लाड, किरण चव्हाण, विक्रम पवार, पी. एस. (बापू) चव्हाण, नितीन चव्हाण, मनोज मगर, बाबासो जाधव आणि हेमंत जाधव यांनी बाधित नागरिकांनी कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यक माहिती घ्यावी, असे आवाहन केले आहे.
(टीप : या बातमीत नमूद करण्यात आलेली माहिती आणि दावे हे शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती व बाधित शेतकऱ्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आधारित असून, यासंदर्भात शासन किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे उपलब्ध झालेली नाही)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या