नेवरी (ता. कडेगाव), दि. 13 जुलै : शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आता अधिक तीव्र स्वरूप धारण केले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघर्ष समितीने राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रक्तदान आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला असून, दि. 17 जुलै 2026 रोजी नेवरी येथून "खून लो, लेकिन खेती मत लो" या घोषणेसह आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. या आंदोलनात तिन्ही तालुक्यांतील हजारो बाधित शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती पलूस-कडेगाव-खानापूर शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक ॲड. दीपक लाड यांनी दिली.
नेवरी येथे सोमवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत आंदोलनाची सविस्तर रूपरेषा निश्चित करण्यात आली. बैठकीला शेतकरी, युवक तसेच माता-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंदोलनाला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
संघर्ष समितीच्या निर्णयानुसार, रक्तदान आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा रक्तदान करतानाचा व्हिडिओ तयार करून तो आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान कार्यालयापर्यंत पेनड्राइव्हद्वारे पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा त्याग, वेदना आणि संघर्ष शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचविणे हा या आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे समितीने स्पष्ट केले.
गेल्या चार महिन्यांपासून शक्तिपीठ महामार्गाविरोधात पलूस, कडेगाव आणि खानापूर तालुक्यात सातत्याने शेतकरी मेळावे, गावोगावी बैठका, जनजागृती मोहीम, सागरेश्वर अभयारण्य बचाव बैठका, महापूर जनजागृती, निवेदने, पायी आत्मक्लेश यात्रा, अधिसूचनेची होळी, मोर्चे, ड्रोनद्वारे मोजणीस तीव्र विरोध तसेच न्यायालयीन लढा सुरू आहे. गांधीवादी मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला आता अधिक व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, येणाऱ्या काळात संघर्ष आणखी तीव्र केला जाणार असल्याचे ॲड. दीपक लाड यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ॲड. दीपक लाड म्हणाले, "ही लढाई केवळ तीन तालुक्यांपुरती मर्यादित नसून शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या १३ जिल्ह्यांतील शेतकरी बांधवांच्या हक्कांची आहे. शेतकऱ्यांची जमीन वाचविणे ही आमच्यासाठी स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींना शेतकरी जनता लोकशाही मार्गाने योग्य उत्तर देईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी रक्त सांडले, तर आमच्या जमिनी वाचविण्यासाठी आम्ही रक्तदान करत आहोत. शक्तिपीठ महामार्ग रद्द होईपर्यंत आमचा संघर्ष अधिक तीव्र होत राहील."
संघर्ष समितीचे विद्याधर महाडिक, उद्योजक महेश कुपाडे आणि आशिष पाटील यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
बैठकीस लता महाडिक, शारदा महाडिक, बाळूताई महाडिक, माय सकट, द्रौपदा सकट, मालन सकट, जनाबाई सकट, मंगल ढवळे, उषा ढवळे, विद्याधर महाडिक, अमोल महाडिक, संपतराव महाडिक, धनाजी महाडिक, आदित्य महाडिक, प्रवीण महाडिक, सोमनाथ महाडिक, संजय गोरड, मनोहर मेटकरी, धनंजय मेटकरी, नानासो ढवळे, संतोष ढवळे, दत्ता ढवळे, शैलेश कांबळे, सौरभ कांबळे, किरण कांबळे यांच्यासह शेकडो महिला, युवक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१७ जुलै रोजी नेवरी येथे होणाऱ्या या रक्तदान आंदोलनाकडे आता राज्यभरातील शेतकरी, सामाजिक संघटना आणि नागरिकांचे लक्ष लागले असून, शक्तिपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाला या उपक्रमामुळे नवे आणि प्रभावी स्वरूप प्राप्त होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या