प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
मिरज : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असलेला शेतकऱ्यांचा पारंपरिक बेंदूर सण आयडियल स्मार्ट सीबीएसई स्कूल, मिरज येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेतकरी आणि शेतीसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.
शाळेच्या पटांगणात बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग लावून, फुलांच्या माळा घालून, पायांवर गुलाल अर्पण करण्यात आला. तसेच बैलांना गोडाचा नैवेद्य दाखवून त्यांच्या श्रमांप्रती आदर व्यक्त करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ममता भोकरे आणि समन्वयक विश्वासराव पाटील यांनी बैलांची पूजा करून शेतकरी आणि कृषी संस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परंपरा, संस्कृती आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची भावना रुजावी, या उद्देशाने शाळेत अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी बेंदूर गीतांचे सादरीकरण केले तसेच बैलांचे शेतीतील योगदान आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील त्यांचे महत्त्व याविषयी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या