प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:नेहरूनगर गावठाण ते जुना येळावी रस्ता जोडण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर लोकसहभागातून मार्ग मिळाला आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांनी स्वखुशीने आपल्या मालकीच्या जमिनीतील काही भाग देण्याचा निर्णय घेतल्याने सुमारे ६० ते ७० शेतकऱ्यांच्या वहिवाटीची मोठी समस्या सुटण्याच्या मार्गावर आली असून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.नेहरूनगर गावठाणाच्या उत्तरेकडील परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून वन विभागाच्या पडीक जमिनीतून सोयीनुसार तयार झालेल्या मार्गाचा वापर शेतकरी शेतीची मशागत,ऊस वाहतूक आणि दैनंदिन ये-जा करण्यासाठी करत होते. मात्र,वन विभागाची ही जमीन प्रकल्पग्रस्तांना हस्तांतरित झाल्यानंतर संबंधित जमिनीवर शेतीची मशागत आणि नांगरट सुरू झाली. त्यामुळे अस्तित्वातील रस्ता पूर्णपणे बंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली.सध्या पेरणी आणि ऊस लागणीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर,शेती अवजारे आणि अन्य वाहने शेतापर्यंत नेणे कठीण झाले होते.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.या पार्श्वभूमीवर हस्तांतरित जमिनींचे मालक आणि स्थानिक शेतकरी यांच्यात सकारात्मक संवाद घडवून आणण्यात आला.त्यातून पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीतील आवश्यक तेवढा भाग देण्यास सहमती दर्शवली.या सहकार्यामुळे १२ फूट रुंदीचा नवीन रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला.
रस्त्याच्या कामासाठी आवश्यक निधीही लोक सहभागातून जमा करण्यात आला असून प्रत्यक्ष कामाला शुभारंभ करण्यात आला. जमीनमालक तसेच शासकीय अधिकारी एम.डी.रेडेकर आणि भारताचे प्रतिनिधित्व केलेले राष्ट्रीय कुस्तीपटू माणिकनाना पाटील नागराळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाची सुरुवात करण्यात आली.यावेळी निमणीचे माजी उपसरपंच आर. डी. (आप्पा) पाटील, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, मयुरआप्पा जाधव, पोलिस पाटील सतीश पाटील, नेहरूनगर ग्रामपंचायत सदस्य अमित देवकुळे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.नेहरूनगर गावठाण ते जुना येळावी रस्ता जोडण्यासाठी मार्गातील उर्वरित अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याबरोबरच गरज पडल्यास कायदेशीर मार्गाचाही अवलंब करण्याचा निर्धार सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केला.लोकसहभाग,परस्पर विश्वास आणि एकजुटीच्या बळावर अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या