गगनबावडा: ग्रामपंचायत शेणवडे, सामाजिक वनीकरण विभाग (गगनबावडा) आणि कृषी विभाग (गगनबावडा) यांच्या संयुक्त विद्यमाने शेणवडे येथे ‘एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हे अभियान अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. या अभियानांतर्गत गावातील गायरान जमिनीवर विविध प्रकारच्या देशी व फळझाडांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.
गायरान जमिनीवर वृक्षारोपण
शेणवडे ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवर उंबर, कोकम, आवळा, पेरू, सीताफळ यांसारख्या देशी आणि बहुगुणी फळझाडांची लागवड करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागाच्या गगनबावडा प्रमुख आदरणीय आशा शिंदे मॅडम, शेणवडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. संपदा प्रकाश पाटील आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक लिना भालकर-परिट मॅडम यांच्या हस्ते तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना गगनबावड्याचे युवा नेते प्रकाश पाटील यांनी सांगितले की, "शेणवडे येथील गायरान जमिनीवर केवळ झाडे न लावता फळझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करून आम्ही शेणवडे ग्रामपंचायतीचे एक वेगळेपण आणि आदर्श जपणार आहोत."
शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन व दशपर्णी अर्क वाटप
वृक्षारोपणासोबतच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी विभागाच्या वतीने थेट शेतीच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभाग प्रमुख श्री. पराग परिट यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना भात शेती, ऊस शेती आणि जनावरांच्या चारा व्यवस्थापनाचे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले.
तसेच, शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर वाढावा यासाठी मान्यवरांच्या हस्ते गावातील शेतकरी बांधवांना दशपर्णी अर्काचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला उपसरपंच रमेश टक्के, डॉ. आनंदा वापिलकर, शिवाजी गुरव, बाजीराव पाटील, पिंटू मोहिते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम कार्वकर, ग्रामसेवक श्री. कृष्णात पाटील, अशोक वापिलकर, दिगंबर म्हाळुंगेकर, ओंकार हेतकर, ग्रामपंचायत सदस्य सौ. अर्चना कांबळे, सीआरपी सौ. रूपाली पाटील आणि सौ. वंदना भोसले यांच्यासह शेणवडे गावातील बहुसंख्येने शेतकरी बांधव, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
या नाविन्यपूर्ण आणि शेतकरीभिमुख उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या