सांगली प्रतिनिधी : आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि संतपरंपरेची अखंड परंपरा असून श्रीक्षेत्र पंढरपूर हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. दरवर्षी महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो वारकरी संतांच्या पालख्यांसोबत आळंदी ते पंढरपूर हा पायी प्रवास करतात. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्यासह सर्व संतांनी समाजाला भक्तीबरोबरच स्वच्छता, शिस्त, सेवा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला आहे.याच संतविचारांना कृतीत उतरवत निर्धार फौंडेशनच्या वतीने यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जेजुरी ते लोणंद या पालखी मार्गावर निर्धार फौंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणावर यांच्या पुढाकारातून सांगलीतील युवकांनी श्रमदान करत पालखी आगमनापूर्वी संपूर्ण मार्ग स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला. या अभियानातून "स्वच्छ वारी... सुंदर वारी" हा संदेश वारकरी आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी बोलताना राकेश दड्डणावर म्हणाले, "आषाढी वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून ती समाजप्रबोधनाची एक मोठी चळवळ आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गाव, शहर तसेच इतर राज्यांतील आणि परदेशातील भाविक या वारीत सहभागी होतात. त्यामुळे स्वच्छतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी वारी हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. निर्धार फौंडेशनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीनंतर चंद्रभागा नदी परिसरात स्वच्छता अभियान राबवितो. मात्र यंदा प्रथमच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आगमनापूर्वी पालखी मार्ग स्वच्छ करून संतांच्या स्वच्छतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाला वारकरी, नागरिक आणि युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच आषाढी वारीनंतर मंगळवार, दि. २८ जुलै रोजी सांगलीतील बहुसंख्य युवकांसह निर्धार फौंडेशनचे स्वयंसेवक श्रीक्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी विशेष श्रमदान अभियान राबविणार असून अधिकाधिक युवकांनी या अभियानात सहभागी व्हावे.
या स्वच्छता अभियानात सांगली शहरातील श्री दत्त साईनाथ मंदिरातील भक्त, श्री राधा गो सेवा केंद्राचे सहकारी,इनाम धामणी विठ्ठल मंदिर व पालखी दिंडीतील वारकरी तसेच अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष श्रमदान करून सहभाग नोंदविला.
यावेळी दिनेश पारेख, भारत जाधव, धनंजय हंकारे, गोपाल सारडा यांच्यासह अनेक स्वच्छता दूत, स्वच्छताप्रेमी नागरिक आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या