प्रतिष्ठा न्यूज/अक्षय कोठावळे
हातकणंगले : दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ तसेच शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील मजले, नेज आणि परिसरातील गावांमध्ये गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व आस्थापने बंद ठेवत आंदोलनाला अभूतपूर्व पाठिंबा दिला.
देशातील शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांबाबत दिल्ली येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, त्याला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटले. दिवसभर अनेक दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि इतर व्यवहार पूर्णपणे बंद राहिल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
बंददरम्यान संपूर्ण परिसरात शांततेचे वातावरण होते. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी बळाचा वापर करून लाठीमार केल्याच्या निषेधार्थ मजले, नेजसह परिसरातील अनेक गावांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत निषेध व्यक्त केला.
यावेळी नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून सरकारने आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, संबंधित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
या कडकडीत बंदमुळे परिसरातील नागरिकांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला असलेला पाठिंबा स्पष्टपणे दिसून आले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या