प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी ‘देवाभाऊ कृषी माऊली सोहळा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दि. 24 जुलै 2026 रोजी दुपारी 4 वाजता उत्सव हॉल, 100 फूट रोड, सांगली येथे होणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रदादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्राताई वाघ यांच्या संकल्पनेतून राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत असून, महिला शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणे, त्यांना स्वावलंबी बनविणे आणि शेतीतील उत्पादनक्षमता वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील 100 महिला शेतकऱ्यांना मोफत ‘कृषी माऊली’ किटचे वितरण करण्यात येणार आहे. या किटमध्ये प्रगत भाजीपाला बियाणे, जैविक खते, खुरपे, विळा, स्प्रे आदी शेतीसाठी उपयुक्त साहित्याचा समावेश आहे. राज्यभरात एकूण 4 हजार महिला शेतकऱ्यांना अशा किटचे वाटप करण्यात येणार आहे.
याशिवाय कृषी विज्ञान केंद्र (KVK), तालुका कृषी अधिकारी (TAO) तसेच कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या उपस्थितीत माती परीक्षणाचे थेट प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे. मातीचा नमुना कसा घ्यावा, जमिनीची सुपीकता कशी तपासावी आणि योग्य पीक नियोजन कसे करावे, याबाबत मार्गदर्शनही करण्यात येईल.
महिला शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती भाजप महिला मोर्चाकडून देण्यात आली.
या कार्यक्रमास परिसरातील महिला शेतकरी भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप महिला मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे व जिल्हा प्रभारी मंजिरीताई गाडगीळ यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या