सांगली, प्रतिनिधी : येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संलग्न व श्री गुजराती सेवा समाज, सांगली संचलित श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालया मध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या जिमखाना उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थिनींच्या क्रीडा, कला, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद, सांगली चे राज्यसेवा वर्ग-२, माध्यमिक शिक्षण विभाग अधीक्षक, , नरेंद्र विष्णू माळी होते. अध्यक्षस्थानी श्री गुजराती सेवा समाज संस्थेचे संचालक चंद्रशेखर गोकाणी होते. संचालक शैलेंद्र धंधुकिया, रितेश शेठ कार्यक्रमास उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कांतीभाई वामजा, सचिव रमणीक दावडा, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
मार्गदर्शन करताना नरेंद्र माळी यांनी विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि शिस्त जोपासावी, असे प्रतिपादन केले. जिमखाना हा केवळ स्पर्धांचा मंच नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले. सातत्य, परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर प्रत्येक विद्यार्थिनीने उत्कृष्ट यश संपादन करू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
स्वागत प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी
वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कला, क्रीडा, सांस्कृतिक व विविध गुणदर्शन उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय सांगली येथे अकाउंटिंग ऑफिस मॅनेजमेंट पदी नवनियुक्त 12 प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संयोजन जिमखाना विभाग उपाध्यक्ष डॉ. एस. एन. गायकवाड, क्रीडा संचालक डी.डी. राऊत यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही. एस. सुखदेव यांनी तर आभार डॉ .एस. एन. गायकवाड यांनी मानले.
सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झालेला हा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासाच्या वाटचालीतील प्रेरणादायी उपक्रम ठरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या