प्रतिष्ठा न्यूज
सांगली| प्रतिनिधी : "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" तसेच "आझाद था, आझाद हूँ और आझाद रहूँगा" अशा जोशपूर्ण घोषणा देत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली. निमित्त होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे.
येथील यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने शांतिनिकेतन बालविकास केंद्र, मराठी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनकार्याचा, राष्ट्रप्रेमाचा, त्यागाचा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा प्रभावी आढावा आपल्या भाषणातून मांडला. विद्यार्थ्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाने देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून ग्रंथालयाच्या कार्यवाह हर्षा बागल उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका मधुरा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. देवीदास सूर्यवंशी यांनी दिनविशेषाचे महत्त्व सांगून लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांच्या प्रेरणादायी कार्याचा परिचय करून दिला. सुनील धुमाळ यांनी आभार प्रदर्शन केले, तर बालिका सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
यावेळी ग्रंथपाल ज्योती मोहिते, सहाय्यक ग्रंथपाल प्रशांत पाटील, कर्मचारी दत्तात्रय वारे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, वाचनसंस्कृती आणि प्रभावी वक्तृत्वाची प्रेरणा जागृत झाल्याचे समाधान उपस्थितांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या