प्रतिष्ठा न्यूज/अक्षय कोठावळे
हातकणंगले : दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत हातकणंगले येथील आंबेडकरवादी संविधान कृती समितीच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण व निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी दिल्लीतील शांततापूर्ण विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा व विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीचा तीव्र निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप करत, गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषण करणारे शास्त्रज्ञ व संशोधक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची सरकारने अद्याप दखल घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
या आंदोलनाला पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रवीण जनगोंडा, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष जाधव, सुरेश पाटील, वैभव कांबळे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेही आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.
आंदोलनात सुहास कांबळे, मार्तंड कांबळे, राम कांबळे, शिरीष थोरात, सदाम मुजावर, ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर, तुषार कांबळे, वैभव जमणे, विपुल आळतेकर, डॉ. विशाल साजणीकर, सुहास लाटवडेकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या