प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहरातील एसटी बस स्थानक परिसराची अवस्था पुन्हा एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बिकट झाली असून,संपूर्ण परिसरात मोठमोठे खड्डे पडल्याने प्रवाशांसह बस चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.पहिला पाऊस पडताच स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरवस्था समोर आली असून,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. परिणामी संपूर्ण परिसरात चिखल, साठला असून,प्रवाशांना चालणेही कठीण झाले आहे.बस स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या बस या खड्ड्यांतून जात असल्याने साचलेले पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असून,रोजचा प्रवास त्रासदायक ठरत आहे.तासगाव तालुक्यातील विविध गावांमधून दररोज शेकडो विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणासाठी एसटीने प्रवास करतात.तसेच नोकरी, व्यवसाय आणि विविध कामांसाठी हजारो नागरिक या स्थानकाचा वापर करतात.त्यामुळे बस स्थानकात दिवसभर मोठी प्रवासी वर्दळ असते.मात्र,अशा महत्त्वाच्या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आणि रस्त्यांची दुरवस्था प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण करत आहे.बस चालकांनाही खड्ड्यांमधून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.वाहनांचे नुकसान होण्याबरोबरच अपघाताची शक्यता वाढली असल्याची भावना चालकांनी व्यक्त केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ही परिस्थिती कायम असतानाही आगार व्यवस्थापन किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.त्यामुळे तातडीने खड्डे बुजवून बस स्थानक परिसरातील रस्त्यांची दुरुस्ती करावी,अशी मागणी प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या