प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
सांगली: केपीज चेस अकॅडेमी, सांगली यांच्या वतीने आयोजित गुरुवर्य स्व. कुमार पांडुरंग माने स्मृती बुद्धिबळ महोत्सव २०२६ ला खेळाडूंचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. सांगलीच्या बुद्धिबळ इतिहासात प्रथमच तब्बल ६०० खेळाडूंचा सहभाग नोंदवत केपीज चेस अकॅडेमीने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी २००, ३००, ४०० आणि ५०० खेळाडूंच्या स्पर्धांचे यशस्वी आयोजनही अकॅडेमीने केले आहे.
२०२४ मध्ये जागतिक बुद्धिबळ महासंघ (फिडे)च्या शताब्दी वर्षानिमित्त पाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अटेंप्ट स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर, फिडेच्या १०२ व्या वर्धापनदिनानिमित्त यंदा गुरुवर्य स्व. कुमार पांडुरंग माने यांच्या स्मरणार्थ हा बुद्धिबळ महोत्सव सुरू करण्यात आला आहे. स्व. कुमार पांडुरंग माने यांनी तब्बल ३२ वर्षे बुद्धिबळ क्षेत्रात कार्य करत अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवले आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन मेधा इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट मॅनेजर व स्पर्धा डायरेक्टर नितीन माने, सांगली जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव चंद्रकांत वळवडे, डॉ. अभिजित चव्हाण, केपीज चेस अकॅडेमीच्या कार्यकारी अध्यक्षा व आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर, करण परीट, आरती मोदी, शाहरुख कुरणे, दीपक वायचळ तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजयकुमार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या महोत्सवात तीन गटांमध्ये स्पर्धा होत आहेत. खुल्या गटात ११७ खेळाडू सहभागी असून त्यापैकी ६२ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन (FIDE Rating) प्राप्त आहे. १३ वर्षांखालील गटात १४५ खेळाडू सहभागी असून त्यामध्ये ४२ मानांकन प्राप्त खेळाडू आहेत. तर ९ वर्षांखालील गटात ९० खेळाडू सहभागी असून त्यापैकी ३ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त आहे.
स्पर्धेच्या मुख्य पंच म्हणून आरती मोदी (कोल्हापूर), करण परीट (इचलकरंजी) आणि शाहरुख कुरणे (कसबे डिग्रज) कार्यरत आहेत. त्यांना रोहिणी तुम्मा, सूर्याजी भोसले, नाझिया पटेल, ईश्वर जांभळे, अनिता भोसले, अरुणा पुराणिक, सपना उपळावीकर, पूजा धनवडे, विजयकुमार माने, नितीन माने आणि लक्ष्मीकांत मठपती यांचे सहकार्य लाभत आहे.
उत्कृष्ट नियोजन, विक्रमी सहभाग आणि दर्जेदार स्पर्धा व्यवस्थापनामुळे हा बुद्धिबळ महोत्सव सांगलीच्या क्रीडा क्षेत्रात एक नवा मानदंड ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या