सांगली : जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्लच्या वतीने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समडोळी येथे प्रत्यक्ष शेतावर जाऊन शेतकरी बांधव व भगिनींसमवेत आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम करत त्यांच्यासोबत संवाद साधत हा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी शेतकरी महिला व पुरुषांसाठी विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धांतील विजेत्यांसह सहभागी शेतकरी भगिनींना दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी स्टीलची भांडी भेट म्हणून देण्यात आली. महिलांनी पारंपरिक उखाणे घेत कार्यक्रमात रंगत आणली. त्यानंतर सर्वांना अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमानंतर शेतकरी बांधव व भगिनींनी, "आमच्यासाठी असा वेगळा आणि आनंददायी कार्यक्रम प्रथमच अनुभवायला मिळाला. आजचा दिवस अविस्मरणीय ठरला," अशा भावना व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन कांचन पाटील यांनी केले. कार्यक्रमास कोऑर्डिनेटर जया जोशी, अध्यक्षा रंजना साठे, सचिव माधवी जोशी, माजी अध्यक्षा वैशाली कुलकर्णी, शैला बिजरगी, कांचन पाटील, रोहिणी कुलकर्णी, अनिता हवलदार, सई देशपांडे, नीलिमा काळे व सुचेता कुलकर्णी उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण वाटून घेण्याचा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या