सांगली, दि. ५ जुलै : महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीने राज्यातील पानपट्टी व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, ७ जुलै २०२६ रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे भव्य धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात राज्यभरातील पानपट्टी व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सांगली जिल्हा पान असोसिएशनने केले आहे.
यावेळी रत्नाकर नांगरे,युसूफ जमादार, राजू पागे,मयूर बांगर,प्रकाश मोरे मकरंद जमदाडे,व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पानपट्टी व्यावसायिकांनी आपला व्यवसाय बंद ठेवून सकाळी १० वाजता आझाद मैदान येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध धोरणांमुळे पानपट्टी व्यवसाय अडचणीत आल्याचा आरोप करत महासंघाने हा मोर्चा आयोजित केला आहे.
मोर्चामध्ये अन्न व औषध प्रशासनाकडून होणाऱ्या कथित अन्यायकारक कारवाया थांबविणे, तंबाखीवरील निर्बंधांचा पुनर्विचार करणे, पानपट्टीधारकांवरील कारवाईत सुसूत्रता आणणे, व्यवसायासाठी अनुदान व सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे, तसेच प्रत्येक पानपट्टीधारकाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत प्राधान्य देण्यासह विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.
सांगली जिल्हा पान असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पान व्यावसायिकांनी या मोर्चात सहभागी होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन केले आहे. राज्यातील लाखो पान व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा निर्णायक ठरेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या