गगनबावडा : तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे जलसाठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तालुक्यात कुंभी मध्यम प्रकल्प, वेसरफ,अंदुर व कोदे असे तीन लघु प्रकल्प असून 'कोदे लघुपाटबंधारे तलाव' आज (दि. ६ जुलै) सकाळी ६.०० वाजता १०० टक्के भरला असून धरणातून सध्या १४२.५७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. या मुसळधार पावसामुळे कुंभी आणि सरस्वती नदीपात्रातील पाणीपातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तसेच, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने धरण क्षेत्र हे 'निषिद्ध क्षेत्र' घोषित केले असून पर्यटकांना या परिसरात येण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे.
धरणांची सांख्यिकी स्थिती (६ जुलै):
कोदे ल.पा. तलाव: पाणीपातळी १२२.१० मीटरवर पोहोचली असून तलाव १००% (६.०६ Mcum) भरला आहे. गेल्या २४ तासांत १७८ मिमी, तर आतापर्यंत एकूण १,४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कुंभी मध्यम प्रकल्प: पाणीपातळी ६००.०० मीटरवर पोहोचली असून एकूण साठा ३१.७५ Mcum (४१.२९%) झाला आहे. गेल्या २४ तासांत १६९ मिमी पाऊस पडला असून प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत एकूण १,४१६ मिमी इतका उच्चांकी पाऊस नोंदवला गेला आहे.
अधिकृत आवाहन:
"कोदे तलाव पूर्ण भरल्यामुळे कुंभी आणि सरस्वती नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत सतर्क राहावे. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या धरण क्षेत्रात पर्यटकांना येण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी."
— अजिंक्य पाटील
(शाखा अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग, कळे शाखा)
"तालुक्यात सर्वत्रच पर्जन्यवृष्टीचा जोर वाढला आहे. हवामान खात्याचा अंदाज पाहता नागरिकांनी कोणतीही हलगर्जी न करता प्रशासनाने दिलेल्या सतर्कतेच्या सूचनांचे पालन करावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी त्वरित स्थानिक प्रशासनाशी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा."
— रूपाली सूर्यवंशी (तहसीलदार, गगनबावडा)
--- भारत साळुंखे ( सहा.पोलीस निरीक्षण गगनबावडा)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या