सांगली : प्रतिनिधी
प्रस्तावित 'शक्तीपीठ' महामार्गाविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय बाधित शेतकरी संघर्ष समितीने घेतला असून, येत्या ७ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारला जाणार असल्याची माहिती संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रत्नागिरी ते नागपूर असा महामार्ग आधीच अस्तित्वात असताना नव्याने 'शक्तीपीठ' महामार्ग उभारण्याची गरज नसून, या प्रकल्पामुळे हजारो एकर सुपीक शेती बाधित होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम होणार असून पर्यावरणीय धोकाही वाढण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या सुमारे ७५ किलोमीटर लांबीच्या मार्गामुळे अंदाजे ५७० हेक्टर क्षेत्र बाधित होणार असल्याचा दावा संघर्ष समितीने केला आहे. यामध्ये वाळवा, खानापूर, कडेगाव आणि पलूस तालुक्यांतील मोठ्या प्रमाणावर शेतीचा समावेश असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होण्याची शक्यता आहे.
पत्रकार परिषदेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा लढा पूर्ण ताकदीने आणि कायदेशीर मार्गाने लढला जाईल. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, पाणी संस्था, सहकारी संस्था तसेच विविध संघटनांनी या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केले असून, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी के. धनाजी गुरव, बी. जी. पाटील, रणजित पाटील, शाहाजी पाटील, ॲड. विजय पाटील, गुंडा पवार, ॲड. दीपक लाड, श्रीराम होनमाने, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या