सांगली, दि. १ जुलै : न्यू एज्युकेशन सोसायटी, सांगली या संस्थेचा ८६ वा वर्धापन दिन संस्थेचे अध्यक्ष श्री. शांतिनाथ कांतेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात पूज्य साने गुरुजी, संस्थेचे आद्य संस्थापक कै. बापूसाहेब दप्तरदार, कै. मुश्रीफ गुरुजी आणि कै. पांडुतात्या कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी शारदास्तवन व स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी कु. कोमल कोकरे हिने "संस्था म्हणजे केवळ दगड-विटांची इमारत नव्हे; तर विचार, संस्कार आणि सेवाभाव यांचा सुंदर मिलाप म्हणजे संस्था होय," हा प्रेरणादायी सुविचार सादर केला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री. सुहास कोळी यांनी केले, तर संस्थेच्या प्रगतीचा अहवाल श्री. विठ्ठल मोहिते यांनी सादर केला.
सन १९४० मध्ये स्थापन झालेल्या न्यू एज्युकेशन सोसायटीचा आज सात शैक्षणिक शाखांपर्यंत विस्तार झाला असून, त्यामध्ये श्रीमती सुंदराबाई दडगे हायस्कूल (सांगली), श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल (हरिपूर), वि. रा. वेलणकर बालविद्यालय (सांगली), सौ. कांचनगौरी र. गोसलिया बालक मंदिर (सांगली), प्रा. सौ. अनुराधा गोविंद कुलकर्णी बालविद्यालय (हरिपूर), सौ. पार्वती किसन आळवेकर बालक मंदिर (हरिपूर) आणि जी. एस. कांते महिला तंत्रनिकेतन (सांगली) या शाखांचा समावेश आहे.
अध्यक्षीय भाषणात श्री. शांतिनाथ कांतेसाहेब म्हणाले, "शाळा ही सरस्वतीचे मंदिर आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यापेक्षा सुसंस्कारित विद्यार्थी घडविण्यावर भर दिला पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने समर्पित भावनेने कार्य करावे. संस्थेच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी संस्था कायम ठामपणे उभी राहील."
वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिक्षक समृद्धी कार्यशाळेत ज्येष्ठ साहित्यिक मा. नामदेव माळी आणि डाएटचे प्राचार्य डॉ. विकास सलगर यांनी शिक्षकांना बहुमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका श्रीमती विजया पाटील तसेच संचालक श्री. राजेंद्र मेंच, श्री. बिरू एडके, श्री. श्रीप्रसाद चौगुले, श्री. सुरेंद्र पाटील, श्री. सुनील भावे, श्री. पंकज आळवेकर, विविध शाळांचे मुख्याध्यापक श्री. सुहास कोळी, श्री. राजकुमार हेरले, श्री. राजू बागुल, सौ. सुवर्णा गायकवाड, सौ. भारती जितकर, सौ. समता मालवणकर, सौ. वैशाली कणिरे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विठ्ठल मोहिते यांनी केले, आभारप्रदर्शन सौ. सुवर्णा गायकवाड यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या