सांगली, दि. १ : महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सांगली येथील चिंतामणराव वाणिज्य महाविद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य श्री. आर. जे. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. पाटील यांनी महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व आणि औचित्य स्पष्ट केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १ जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो, असे सांगून त्यांनी हरितक्रांतीमध्ये वसंतराव नाईक यांचे योगदान अधोरेखित केले. त्यांच्या पुढाकारामुळे सुधारित बियाण्यांचा व रासायनिक खतांचा वापर वाढला, परिणामी अन्नधान्य उत्पादनात मोठी वाढ होऊन भारत कृषी उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली. या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना कृषिक्रांतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पस समितीचे समन्वयक श्री. एन. के. आपटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हरितक्रांतीच्या काळात चलनातील नाण्यांवर 'अधिक धान्य पिकवा' (Grow More Food) हा संदेश कोरण्यात आला होता, याची त्यांनी उपस्थितांना आठवण करून दिली. पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालय परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांची नियमित जोपासना करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. कुंभार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या