प्रतिष्ठा न्यूज /योगेश रोकडे
मिरज :आषाढी एकादशीच्या पावन पर्वाचे औचित्य साधत खाडे ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, मिरज यांच्या नियोजनातून सर्व खाडे शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी मल्लेवाडी येथे आयोजित केलेली विठूरायाची वारकरी दिंडी अत्यंत भक्तिमय वातावरणात, पारंपरिक उत्साहात आणि वारकरी संस्कृतीचा जागर करणाऱ्या वातावरणात संपन्न झाली. विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेबद्दल आदर निर्माण करण्याच्या उद्देशाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडीची सुरुवात वारकरी संप्रदायाच्या अनुयायांनी पारंपरिक पंचपदी सादर करून केली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या निनादात, "ज्ञानोबा-तुकाराम", "पांडुरंग हरी" आणि "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" अशा अखंड नामघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. भगव्या पताका, तुळशी वृंदावन, पारंपरिक वेशभूषा आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे दिंडीला विशेष आकर्षण लाभले.
गावातील प्रमुख मार्गांवरून दिंडी मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून तसेच विठ्ठलनामाचा गजर करत दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. मार्गात पारंपरिक रिंगण सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याने वारकरी परंपरेची वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती उपस्थितांना मिळाली. दिंडीची सांगता मल्लेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात आणि सामूहिक आरतीने करण्यात आली.
या प्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेत्या सौ. सुमनताई खाडे, भाजपा महिला मोर्चा सांगली जिल्हाध्यक्षा तथा खाडे शैक्षणिक संकुलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वातीताई सुशांत खाडे, मल्लेवाडीचे सरपंच विनायक पाटील, उपसरपंच वर्षा पाटील, ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण, ग्रामसेवक, तलाठी, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पवार व सदस्य, पोलीस पाटील अभय शिंदे, तसेच मुख्याध्यापिका करुणा माने यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत वारकरी परंपरेतील भक्ती, समता, सेवा आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले.
दिंडीच्या यशस्वी आयोजनासाठी मल्लेवाडी रणझुंजार मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, आरोग्य विभाग मल्लेवाडी तसेच वारकरी संप्रदायाच्या अनुयायांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा जिवंत अनुभव घेत भक्ती, शिस्त, एकात्मता आणि सामाजिक मूल्यांचा सुंदर संदेश समाजापर्यंत पोहोचविला. ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विठूरायाच्या नामस्मरणात सहभागी होत या भक्तिमय सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित ही वारकरी दिंडी मल्लेवाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली.

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या