सांगली प्रतिनिधी : स्वराज्यरक्षक, स्वामिनिष्ठ आणि देशभक्त वीररत्न शिवा काशीद यांच्या ३६६ व्या पुण्यतिथीनिमित्त संत सेना महाराज मंदिर, गावभाग (सांगली) येथे भावपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी वीररत्न शिवा काशीद यांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संत सेना सेवा संघाच्या वतीने करण्यात आले होते. संघाचे अध्यक्ष श्री. अरुण केशव साळुंखे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी शिवा काशीद यांच्या अद्वितीय स्वामिनिष्ठेचा, त्यागाचा आणि देशभक्तीचा इतिहास उलगडून सांगत त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
यावेळी वीर शिवा काशीद यांच्या वीरगाथेचा जागर करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली पुन्हा संत सेना महाराज मंदिर येथे येऊन समाप्त झाली. येथे शिवा काशीद यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून उपस्थितांनी त्यांना अभिवादन केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिवा काशीद यांच्या अतुलनीय शौर्य, स्वराज्याप्रती असलेली निष्ठा आणि राष्ट्रासाठी प्राणार्पण करण्याच्या त्यांच्या त्यागमय जीवनाचा गौरव केला. स्वराज्य आणि राष्ट्रहितासाठी आवश्यक असेल तर सर्वोच्च बलिदान देण्याची प्रेरणा शिवा काशीद यांच्या जीवनातून मिळते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला संत सेना सेवा संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच संत सेना महाराज सलून असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने नाभिक समाजबांधव उपस्थित होते. सर्व सलून व्यावसायिकांनी उपस्थित राहून स्वराज्यरक्षक वीर शिवा काशीद यांच्या स्मृतीला अभिवादन करत त्यांच्या आदर्शाचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
याच वेळी ३० जुलै रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या हेअर कटिंग स्टाईल स्पर्धेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. ही स्पर्धा स्कावे अकॅडमी यांच्या पुरस्कृत आयोजित करण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रातील सर्व सलून व्यावसायिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कलेचा उत्कृष्ट आविष्कार सादर करावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संत सेना महाराज सलून असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विक्रम गंगधर यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी आणि समाजबांधवांचे आभार मानले. राष्ट्रभक्ती, स्वामिनिष्ठा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या