छायाचित्रात डावीकडून उद्घाटक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, विज्ञान लेखक जगदीश काबरे, पालवीचे आधारस्तंभ आशिष शहा, प्रमुख पाहुण्या अनुराधा गोरे आणि पालवीच्या उद्धारक मंगलताई शहा
पंढरपूर म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती विठ्ठल-रखुमाईची नगरी, वारकऱ्यांचा अखंड हरिनामाचा गजर आणि संतांच्या करुणा, समता व मानवतेचा संदेश. पण या पवित्र नगरीत देवळांच्या कळसांपेक्षाही उंच असे एक कार्य शांतपणे सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील पालवी प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला आणि हा अनुभव मनाला अक्षरशः स्पर्श करून गेला. काही भेटी या केवळ औपचारिक राहत नाहीत; त्या मनाच्या तळाशी कायमस्वरूपी घर करून राहतात. एखाद्या संस्थेची इमारत, तिची व्यवस्था किंवा तिची प्रसिद्धी पाहून आपण प्रभावित होतो; पण 'पालवी' प्रकल्पात पाऊल टाकल्याक्षणी जाणवते ती माणुसकीची ऊब, मायेचा स्पर्श आणि निरपेक्ष सेवाभाव. तेथून परतताना मनात अनेक प्रश्न होते, डोळ्यांत नकळत पाणी होते आणि या कार्याबद्दल अपार आदरही होता. विठ्ठलाच्या या पंढरीत माणुसकीचे आणखी एक मंदिर उभे राहीले आहे, याची जाणीव या भेटीतून झाली. येथे घंटानाद नाही, आरत्या नाहीत, सोनेरी कळस नाहीत; पण निराधार मुलांचे हसरे चेहरे आहेत, मायेने डोक्यावरून फिरणारा हात आहे आणि निःस्वार्थ सेवेतून साकारलेली खरी भक्ती आहे.
सन २००१ मध्ये सामाजिक कार्यकर्त्या मंगल शहा यांनी अवघ्या दोन एचआयव्ही बाधित मुलांपासून या कार्याची सुरुवात केली. समाजाने नाकारलेल्या, आई-वडिलांपासून वंचित झालेल्या आणि आयुष्याच्या सुरुवातीलाच मृत्यूची सावली सोबत घेऊन जन्मलेल्या या मुलांना त्यांनी आपलेसे केले. आज हे छोटसं रोपटं वटवृक्ष बनले असून येथे दीडशेहून अधिक मुलांचे संगोपन होत आहे. या मुलांमध्ये सहा महिन्यांच्या अर्भकांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक जण आहेत. या मुलांना जन्मत:च एचआयव्हीची लागण झाली होती. ती रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत सापडली, रेल्वेस्टेशन, एसटी स्टँड, स्मशानभूमीत किंवा कचराकुंडी सारख्या सार्वजनिक ठिकाणी टाकून दिलेली होती. या निष्पाप मुलांचा त्यांच्या परिस्थितीत काहीही दोष नाही; पण समाजाने अनेकदा त्यांच्याकडे दयेने किंवा भीतीने पाहिले. पालवी प्रकल्पाने मात्र त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहिले. त्यांना केवळ आसरा दिला नाही, तर आई-वडिलांच्या मायेची उब, शिक्षणाची संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि आनंदाने हसण्याचे कारण दिले.
पालवी प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे केवळ औषधोपचार केले जात नाहीत. एचआयव्हीबाधित मुलांना नियमित औषधे, वैद्यकीय तपासणी, पौष्टिक आहार आणि आरोग्याची सर्वतोपरी काळजी दिली जाते. त्याचबरोबर त्यांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासालाही तितकेच महत्त्व दिले जाते. या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात आली आहे. येथे शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर नाही, तर जीवन समृद्ध करण्याची प्रक्रिया आहे. अलीकडे या शाळेत रघुनाथ माशेलकर विज्ञान केंद्र सुरू करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आम्हाला या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मिळाली. शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा पाहायलाही मिळत नाही किंवा स्वतः प्रयोग करण्याची संधी मिळत नाही. त्याउलट 'पालवी'तील या मुलांसाठी विज्ञान प्रत्यक्ष अनुभवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयोग, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय या मुलांमध्ये विकसित व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागा व्हावा, हा या उपक्रमामागचा विचार अत्यंत प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही या प्रयोगशाळेचा लाभ घेता यावा असा त्यांचा प्रयत्न रहाणार आहे. आयुष्य किती मोठे आहे यापेक्षा ते किती अर्थपूर्ण आहे, याला येथे अधिक महत्त्व दिले जाते.
या प्रकल्पाचे कार्य फक्त एचआयव्हीबाधित मुलांपुरते मर्यादित नाही. येथे मतिमंद मुलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. तसेच एकल महिलांच्या पुनर्वसनासाठीही उल्लेखनीय काम केले जाते. समाजात विविध कारणांनी एकाकी पडलेल्या महिलांना येथे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. शिवणकाम, हस्तकला, विविध उपयुक्त वस्तू तयार करणे अशा अनेक माध्यमांतून त्यांना स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नव्हे, तर त्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विपणन करण्याची जबाबदारीही संस्था स्वीकारते. त्यामुळे मदतीवर जगण्याऐवजी स्वाभिमानाने उभे राहण्याचा आत्मविश्वास या महिलांना मिळतो.
या संपूर्ण कार्यामागची प्रेरणाशक्ती म्हणजे मंगल शहा. पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांचा उत्साह, कार्यतत्परता आणि मुलांवरील प्रेम पाहून आश्चर्य वाटते. त्या स्वतः मुलांसाठी स्वयंपाक करतात, त्यांना प्रेमाने भरवतात, त्यांच्याशी खेळतात, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, तर केवळ समाधानाचे तेज दिसते. या मुलांसाठी त्या केवळ संस्थापिका नाहीत, तर आई आहेत. त्यांचा हा सेवाभाव पाहताना संतांच्या करुणेचा प्रत्यय येतो. विशेष म्हणजे हे कार्य आता एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. शहा कुटुंबातील दुसरी पिढीही त्यात पूर्णपणे सहभागी झाली आहे. आशिष शहा, त्यांच्या पत्नी आणि आता तिसरी पिढीही या कार्यात समर्पित भावनेने सहभागी होत आहे. ही परंपरा केवळ संस्था चालविण्याची नसून माणुसकी जपण्याची आहे.
या प्रकल्पातील निवासी शिक्षकांचाही उल्लेख आवर्जून करावा लागेल. विशेषतः वैभव मोरे या तरुण शिक्षकाने मुलांशी निर्माण केलेले नाते विलक्षण आहे. तो केवळ शिक्षक म्हणून शिकवत नाही, तर या मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. मुलांसोबत राहणे, त्यांच्यासोबत शिकणे, खेळणे, त्यांना भावनिक आधार देणे हे त्याच्या दैनंदिन जीवनाचेच अंग झाले आहे. शिक्षणाचा खरा अर्थ विद्यार्थ्यांच्या जीवनाशी जोडला गेला पाहिजे, याचे हे सुंदर उदाहरण आहे. शिक्षणात प्रेम आणि आपुलकी किती महत्त्वाची असते, याचा तो जिवंत आदर्श आहे.
आजही समाजात एचआयव्हीविषयी अनेक गैरसमज आहेत. एचआयव्हीबाधित व्यक्तींबरोबर राहिल्याने, हात मिळवल्याने, एकत्र जेवल्याने किंवा स्पर्श केल्याने संसर्ग होत नाही, हे विज्ञानाने अनेक वर्षांपूर्वी स्पष्ट केले आहे. तरीही भीती, अज्ञान आणि पूर्वग्रह यांमुळे या मुलांना समाजापासून दूर ठेवले जाते. त्यांच्या आई-वडिलांच्या परिस्थितीची शिक्षा या निष्पाप मुलांना मिळू नये. त्यांना दयेची नव्हे, तर स्वीकाराची गरज आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने नव्हे, तर समानतेच्या नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे.
पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या चरणी लाखो रुपये अर्पण केले जातात. मंदिरांचे कळस सोन्याने मढवले जातात. अनेकांना त्यातून पुण्य मिळवायचे असते. पण संतांचा संदेश वेगळा होता. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा; देव तेथेच जाणावा." हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी काही माणसे समाजात अजूनही आहेत आणि त्यापैकी शहा कुटुंब हे एक उज्ज्वल उदाहरण आहे. त्यांनी देवाला दगडात शोधण्याऐवजी माणसात शोधले. त्यांनी आपल्या संपत्तीचा उपयोग मंदिरांच्या कळसांसाठी नव्हे, तर उपेक्षित मुलांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटवण्यासाठी केला. हीच खरी भक्ती, हाच खरा धर्म आणि हीच खरी समाजसेवा आहे. पंढरपूरच्या एका बाजूला विठ्ठल मंदिरात भक्तिभावाचा अखंड गजर सुरू असतो. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, चोखामेळा आणि गाडगेबाबा यांनी देव शोधायचा असेल तर तो माणसात शोधा, असा संदेश दिला. दुर्दैवाने आपण अनेकदा हा संदेश ऐकतो, पण आचरणात आणत नाही. मंदिरांचे कळस सोन्याने मढवले जातात, मोठमोठे धार्मिक सोहळे होतात, कोट्यवधी रुपयांच्या देणग्या दिल्या जातात; पण एखाद्या निराधार मुलाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आणणारे हात फार कमी दिसतात. शहा कुटुंबाने मात्र आपल्या संपत्तीचा आणि आयुष्याचा उपयोग समाजातील सर्वाधिक उपेक्षित मुलांसाठी केला आहे. हीच खरी मानवसेवा आणि हाच खरा धर्म आहे.
पालवी प्रकल्पाला भेट देताना जाणवलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे कुणालाही त्याच्या आजाराने ओळखले जात नाही; प्रत्येक मुलाला त्याच्या नावाने, स्वभावाने, हसऱ्या चेहऱ्याने आणि स्वप्नांनी ओळखले जाते. या मुलांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यांतील माया पाहिली की माणुसकी अजून जिवंत आहे, यावर पुन्हा विश्वास बसतो. पालवी प्रकल्पातून बाहेर पडताना मनात एकच विचार घोळत होता, तो म्हणजे आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी किती प्रयत्न करतो; पण देवासारखी निरागस मुले आपली वाट पाहत असताना आपण त्यांच्यासाठी किती वेळ देतो? समाजातील प्रत्येक व्यक्तीने अशा संस्थांच्या पाठीशी उभे राहिले, तर अनेक मुलांचे आयुष्य उजळून निघू शकते. मदतीचा हात नेहमी पैशाचाच असावा असे नाही; वेळ, कौशल्य, प्रेम, ज्ञान आणि आपुलकीही तितकीच मौल्यवान असते. त्यामुळे अशा संस्थांना समाजाने केवळ टाळ्यांचा नव्हे, तर प्रत्यक्ष सहकार्याचा हात दिला पाहिजे. आर्थिक मदत, स्वयंसेवा, वस्तूरूपाने योगदान किंवा समाजात योग्य जनजागृती, ज्याला जे शक्य आहे ते त्याने करावे.
पालवी प्रकल्प ही केवळ एक संस्था नाही; ती आशेची पालवी आहे, माणुसकीचा श्वास आहे आणि करुणेला कृतीची जोड देणारा एक जिवंत आदर्श आहे, माणुसकीचे विद्यापीठ आहे आणि संतांच्या विचारांचा आधुनिक काळातील साक्षात अविष्कार आहे. मंगल शहा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब, वैभव मोरेसारखे समर्पित शिक्षक आणि या सेवायज्ञात सहभागी असलेले अनेक कार्यकर्ते समाजासाठी दीपस्तंभ आहेत. अशा कार्यकर्त्यांना मनःपूर्वक प्रणाम. कारण त्यांनी दाखवून दिले आहे की, देव शोधायचा असेल तर तो मंदिरात नव्हे, तर निराधारांच्या डोळ्यांतील आशेच्या किरणात आणि त्यांच्यावर प्रेमाने हात ठेवणाऱ्या माणसाच्या हृदयात सापडतो. त्यांचे कार्य समाजाला केवळ प्रेरणा देणारे नाही, तर प्रत्येकाने आपल्या जीवनात माणुसकीची एक छोटी पालवी फुलवावी, अशी अंतर्मुख करणारी हाक देणारे आहे.
(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या